दिनांक १७ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील साळवण देवी रोड, मेन रोड लगत असलेल्या मलंग बाबा ट्रस्टच्या जागेत दोन्ही बाजूने अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री अकराच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील सरकारी मालमत्तेची तोडफोड करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला.

या घटनेत ५४८ डी हायवेलगत येथील ‘स्टॉप’ नावाचा फलक हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच नगर परिषदेच्या सार्वजनिक महिला शौचालयाची भिंत पाडण्यात आली.

श्रीगोंदा तालुक्यात अवैध धंद्यांचा जोर वाढला असून, साळवण देवी रोडवरील गुटखा विक्रेत्यांनी तर कहर केला आहे. या गुटखा विक्रेत्याची मजल एवढी वाढली की, सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याची हिंमत त्यांनी केली.

यापूर्वी डी.वाय.एस.पी. खाडे यांनी या गुटखा विक्रेत्यावर छापा टाकून मोठा ऐवज जप्त केला होता, तरीही आजही राजरोसपणे साळवण देवी रोडवर गुटखा विकला जात आहे.
नागरिकांना त्रास, महिला व विद्यार्थ्यांची गैरसोय या अवैध व्यवसायांमुळे साळवण देवी रोडवरील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळेतील विद्यार्थी आणि महिलांना या प्रकारांमुळे मोठी गैरसोय व धोका निर्माण झाला आहे.

हा गंभीर प्रकार काल, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने श्रीगोंदा तहसीलदारांना निवेदन देऊन या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे.
अवैध व्यवसायांसाठी केलेली जागा, सरकारी बोर्डाची तोडफोड आणि सरकारी शौचालयाची तोडफोड जेसीबीच्या सहाय्याने करणाऱ्यांवर व संबंधित गुटखा विक्रेता व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी… जेसीबीच्या मालकावर व चालकावर देखील कायदेशीर कारवाई करावी..

मलंग बाबा ट्रस्टच्या परिसरात सुरू असलेल्या चिकनच्या दुकानांमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने ती बंद करावी… परिसरातील वापरायोग्य नसलेले टॉयलेट नगर परिषदेने त्वरित जमीनदोस्त करावे… परिसरामध्ये झाडे लावावी आणि चौक सुशोभीकरणासाठी नगर परिषदेने भविष्यात निधी द्यावा.. अशी मागणी करण्यात आली आहे.
तहसीलदारांना दिलेल्या पत्रात नाना शिंदे यांनी परिसरातील अवैध धंदे त्वरित बंद न झाल्यास आणि परिसर स्वच्छ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

यावेळी त्यांच्यासोबत साळवण देवी रोड येथील युवक कार्यकर्ते डॉ. सागर कोथिंबीरे, संदीप कोथिंबीरे, सोनू कोथिंबीरे, बबलू कोथिंबीरे, समीर कोथिंबीरे तसेच पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(निवेदन)
