जिल्ह्यात ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन’ योजनेला गती

अहिल्यानगर, दि. १६ : महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सन २०२५-२६ मध्ये एकूण १० हजार ४२१ बालकांना ४ कोटी ५४ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा थेट आर्थिक लाभ वितरित करण्यात आला आहे. तसेच सन २०२४-२५ मध्ये ७ हजार १२३ बालकांना १९ कोटी २३ लाख २१ हजार रुपयांची मदत देण्यात आली होती. या योजनेमुळे जिल्ह्यातील दुर्बल व संवेदनशील घटकांतील बालकांना मोठा आर्थिक व सामाजिक आधार मिळत आहे.

दिनांक ३० जून २०२३ पासून ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून अनाथ, निराधार, एक पालक असलेली तसेच गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या पालकांची मुले अशा विविध घटकांतील बालकांचा यात समावेश करण्यात आला आहे. बालकांचे संगोपन सक्षमपणे व्हावे तसेच त्यांच्या शिक्षण, आरोग्य व पोषणात कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे लाभाची रक्कम डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे पारदर्शकता वाढली असून लाभ वेळेत मिळण्यास मदत होत आहे. प्रशासकीय प्रक्रियेतील विलंब टाळल्याने गरजू बालकांपर्यंत मदत जलद पोहोचविणे शक्य झाले आहे.

योजनेमुळे लाभार्थ्यांना सातत्याने आर्थिक आधार मिळत असून त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे सुलभ झाले आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविका, बाल विकास प्रकल्प अधिकारी व इतर यंत्रणांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना योजनेचा लाभ दिला जात आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम म्हणाले की, “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही जिल्ह्यातील गरजू व निराधार बालकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. योजनेची रक्कम डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. त्यामुळे बालकांचे संगोपन, शिक्षण व आरोग्याच्या गरजा पूर्ण होण्यास मोठी मदत होत आहे. योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील असून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविणे हे आमचे प्राधान्य आहे.”

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading