नागवडे कारखान्यामधील मळीच्या काळ्या बाजाराची मुख्यमंत्री,सहकार मंत्र्यांसह उत्पादन शुल्क मंत्र्याकडे सखोल चौकशीची,भाजपाच्या संदीप नागवडेंची मागणी…
श्रीगोंदा दिनांक ६ मे :-
शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची मळी काळ्या बाजाराने विकली जात असून,या कारखान्याच्या मळीचा एक टँकर सोलापूर – पुणे महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने,दिनांक १ मे रोजी पकडुन,पुण्यात त्या बाबत गुन्हाही दाखल केला आहे.याप्रकरणी संबंधित कारखान्याच्या एका अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. नागवडे साखर कारखान्याने अनेक दिवसांपासून गेट पास न करता मळीचे टँकर विकण्याचा काळा बाजार चालवला आहे. अखेर १ मे रोजी हा काळा बाजार उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मळीच्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी,श्रीगोंदा तालुका भाजपाचे युवाध्यक्ष संदीप नागवडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या आपल्या निवेदनात संदीप नागवडे यांनी नमूद केेेले आहे की, दि.४ जानेवारी २०१९ रोजी सांयकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या आसवानी विभागातील मळीची साठवण टाकी सहजगत्या दहनाने फुटली. त्या टाकीत सुमारे १ कोटी ७० लाख रुपयांची(३ हजार ५८ मे.टन)मळी होती.या प्रकारात कारखान्याचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले.तसेच शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये ही मळी पसरल्याने,अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.त्यातील काही शेतकऱ्यांना कारखान्याने नुकसान भरपाई दिली असल्याचे समजते.
मळीची टाकी फुटल्यानंतर दि.५ जानेवारी २०१९ पासून कारखान्याच्या कामगारांनी जेवढी भरता येईल,तेवढी मळी रिकाम्या टाकीमध्ये भरून घेतली.ती सुमारे तीस लाख रुपयांची (५०० मे.टन) मळी असावी.कारखान्याने पूर्ण टाकीतील म्हणजे (३ हजार ५८ मे.टन)मळीच्या आणि टाकीच्या किमतीची नुकसान भरपाई विमा कंपनीकडे मागितलेली असून,गोळा केलेली सुमारे ३० लाखाची(५०० मे.टन)मळी पुन्हा हिशोबात घेतलेली दिसत नाही.शिवाय हीच मळी काळ्या बाजाराने विकण्याचा पराक्रम नागवडे साखर कारखान्यात चालू होता.त्यातील एक टँकर उत्पादन शुल्क विभागाने पकडून,गुन्हा दाखल केलेला असल्याचे संदीप नागवडेंनी निवेदनात म्हटले आहे.
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या आसवानीचा परवाना कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या नावावर आहे.मळीच्या या काळ्या बाजाराचा व्यवहार चेअरमन यांच्या साथीशिवाय कार्यकारी संचालक करूच शकत नाही. ज्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे,तो अधिकारी एवढे मोठे धाडस करू शकत नाही. कारखान्याच्या गेटमधून ही मळी बाहेर पडलीच कशी ? यामध्ये कोण कोण अधिकारी व कर्मचारी सामील आहेत ? याची चौकशी उत्पादन शुल्क विभागाने केलेली नाही.उत्पादन शुल्क विभागाने मळीच्या प्रकरणात गुन्हा कार्यकारी संचालक आणि चेअरमन यांच्यावर दाखल करणे आवश्यक असताना,एका अधिकाऱ्याला विनाकारण बळीचा बकरा करून अटक केलेली आहे. कार्यकारी संचालक आणि चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून,उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण तडजोड झाली असल्याची तालुक्यात चर्चा असल्याचे संदीप यांचे म्हणणे आहे.काँग्रेस पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावयास लावून उत्पादन शुल्क मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या मार्फत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न नागवडे साखर कारखान्यामार्फत सध्या चालू असून, उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांशी तडजोडी करण्याचाही प्रयत्न सध्या जोरात चालू असल्याचे निवेदन कर्त्यांनीं म्हणणे मांडले आहे.
लाखो रुपयांच्या मळीच्या काळ्या बाजाराची मुख्यमंत्र्यांनी सी.आय.डी.मार्फत चौकशी करावी.नागवडे सहकारी साखर कारखान्याकडे ३१ डिसेंबर २०१८ रोजी किती मळी शिल्लक होती ?मळीची जी साठवण टाकी फुटली त्यामध्ये किती मळी होती ? कारखान्याने मळी आणि टाकीच्या नुकसानीचा किती रुपयांचा विमा क्लेम केलेला आहे?सांडलेली किती बेहिशोबी मळी कारखान्याने भरून ठेवली होती?ती स्टॉकला जमा घेतली होती का?या घटनेला चार महिने झालेले असून,भर उन्हाळ्यात सांडलेली मळी कधीच वाळून गेलेली असताना,कारखान्याचे (कार्यकारी संचालक) रमाकांत नाईक सांगतात, बाहेरच्या लोकांनी ही मळी परस्पर विकली असेल.(कार्यकारी संचालक) यांना नोकरी करावयाची असल्याने,ते चेअरमन यांच्या सल्ल्याने जाब जबाब देऊन मळीचा काळा बाजार झाकून नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने या गैरप्रकारची चौकशी करून,परवानाधारक (कार्यकारी संचालक)आणि त्यांना साथ देणारे (चेअरमन)यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.बळीचा बकरा केलेल्या अधिकाऱ्याला न्याय द्यावा.अशीही मागणी संदीप नागवडे यांनी केली असून,एकंदरीत कारखान्याची टाकी फुटल्याची आपत्ती पदाधिकाऱ्यांनी इष्टापतीत बदलण्याचा प्रयत्न या प्रकारात केलेला दिसतो. कारखान्याला अद्याप एक पैसाही विमा मिळालेला नसून,तो जास्तीत जास्त ३५ लाखापर्यंत विमा मिळू शकतो.आणि कारखान्याचे नुकसान मात्र दोन कोटी रूपया पर्यंत झालेले आहे.असेही नागवडेे यांचे म्हणने आहे.
त्याचबरोबर या प्रकरणाची सी.आय.डी.मार्फत चौकशी करन्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत मुख्यमंत्री पोर्टलवर ही तक्रार दाखल करण्यात आलेली असल्याचे संदीप नागवडे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.