श्रीगोंदा कारागृहातील ३० पुरुष व ६ महिला कैदी कोरोना पॉझिटिव्ह ! पोनि. जाधव यांच्या सतर्कतेमुळे तात्काळ उपाययोजना.

दिनांक ३ ऑक्टोबर,श्रीगोंदा:

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि जिल्ह्यातील काही उपकारागृहात कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी उपकारागृह आणि रक्षकांशी चर्चा केली. तर, ४ कैदी तापाने आजारी असल्याने त्यांची कोरोना चाचणी केली. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यानंतर कारागृहातील ५५ कैद्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ३० पुरुष व ६ महिला कैदी पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी माध्यमांना दिली आहे. ते म्हणाले की, ३६ पैकी २ आरोपींना जामीन झाल्याने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल येथे क्वारंटाइन करण्यात येणार आहे. तसेच, इतर ३४ पैकी ६ महिला आरोपी व ५ पुरुष आरोपी यांची व्यवस्था उपकारागृह श्रीगोंदा येथेच केली आहे.

उर्वरित २३ आरोपींना माळीवाडा, अहमदनगर येथील कैद्यांसाठी असलेल्या कोविड सेंटर मध्ये पाठविण्यात आलेले आहे. आज दिनांक ३ ऑक्टोबर रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या पथकाने पोलीस ठाणे आवारात ही चाचणी केली.

याबाबत पोनि. दौलतराव जाधव यांनी तातडीने (जेलर) होगले तसेच (तहसीलदार तथा इनसिडेंट कमांडर) चारुशीला पवार व अहमदनगर येथील वरिष्ठांना माहिती दिली. दरम्यान पोनि. दौलतराव जाधव यांच्या सजगतेमुळे तातडीने निदान झाल्याने पॉझिटिव्ह कैदी यांना लक्षणे आढळताच उपचार मिळाला असल्याने ते लवकर बरे होतील असा विश्वास डॉ. खामकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

स्रोत:(पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading