चीनच्या (China) वुहान (Wuhan) शहरातून पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. फक्त चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे ८०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आता भारतालाही कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. कोरोनाव्हायरस सर्वात जास्त पसरण्याचा धोका असणाऱ्या ३० देशांच्या यादीत भारत १७व्या स्थानी आहे. या पार्शभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चिनफिंग (Chinese President Xi Jinping) यांना पत्र लिहिले आहे.
चीनमधील कोरोना व्हायरसच्या प्रकोपाबाबत प्रधानमंत्री मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
चीनमधील नागरिकांशी भारत कोणताही दुजाभाव करणार नाही. तसेच कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी भारत सहकार्य करण्यास तयार असल्याचे,प्रधानमंत्री मोदी यांनी शी चिनफिंग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. कोरोना व्हायरसने चीनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
रविवारी चीनच्या कोरोना व्हायरसच्या साथीमुळे मृतांची संख्या ८०३ वर पोहोचली आहे. ही संख्या २००२-२००३ साली पसरलेल्या एसएआरएस (SARS) या विषाणूंच्या मृतांपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर ही संख्या सर्वाधिक मानली जात होती. तीव्र श्वसन सिंड्रोममुळे २००२-२००३ साली ७४७ लोकांचा मृत्यू झाला होता. हुबेईच्या आरोग्य विभागानेही आपल्या दैनंदिन अपडेटमध्ये मध्य प्रातांतील आणखी २,१७७ नव्या प्रकरणांची पुष्टी केली आहे. आता संपूर्ण चीनमध्ये ३६,६९० हून अधिक पुष्टी केलेली प्रकरणे आहेत.
कोणत्या देशात किती रुग्ण..?
जपान: ९६,सिंगापूर: ४०,थायलंड: ३२,दक्षिण कोरिया: २५,तैवान : १६,मलेशिया : १६,ऑस्ट्रेलिया: १४,जर्मनी: १४,व्हियतनाम: १४,अमेरिका: १२ रुग्ण, एकाचा चीनमध्ये मृत्यू,फ्रान्स : ११,संयुक्त अरब अमिरात: १,कॅनडा: ६,फिलिपाईन्स: ३ रुग्ण, एकाचा मृत्यू,ब्रिटन: ३,भारत: ३,रशीया : २,इटली: २,ब्रेल्जियम: १,नेपाळ: १,श्रीलंका: १,स्वीडन: १,स्पेन: १,कम्बोडिया: १,फिनलंड: १