कर्जत कारागृहातून पळालेल्या दोघांना वडगाव मावळमधून अटक; पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर पोलिसांची संयुक्त कारवाई.

दिनांक १३ फेब्रुवारी,कर्जत:
दुय्यम कारागृहाच्या छताचे लोखंडी गज वाकवत,कौले उकलून पाच जण ९ फेब्रुवारी रोजी पळून गेले होते.पलायन केलेल्या चौघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून,चौघांना न्यायालयीन कोठडीत असताना त्यांनी हे कृत्य केले आहे. तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर त्यातील तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. एकाला इंदापूर तालुक्यातील न्हावी मधून तर दोघांना मावळ तालुक्यातील वडगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (रा.जवळा,ता.जामखेड), मोहन कुंडलिक भोरे (रा.कवडगाव,ता. जामखेड) अशी वडगाव मावळ मधून ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. गंगाधर लक्ष्मण जगताप (रा.म्हाळंगी, ता.कर्जत) असे न्हावी येथून ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.अक्षय रामदास राऊत (रा.पारेवाडी, ता.जामखेड), व चंद्रकांत महादेव राऊत (रा.पारेवाडी, ता.जामखेड) हे दोघे फरार आहेत.
अहमदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर याच्यावर चोरी आणि शस्त्र बाळगल्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. मोहन भोरे, अक्षय राऊत, चंद्रकांत राऊत या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. आरोपी गंगाधर जगताप याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
कारागृहातून पाच आरोपी पळून गेल्याने राज्यभर खळबळ उडाली असून, कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजेनीं घटनास्थळाला भेट देत पोलिसांना सूचना दिल्या.अहमदनगर पोलिसांनीं स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर पोलिसांची चार पथके तयार करून शोध सुरु केला.
या गुन्ह्यातील तिसरा आरोपी गंगाधर जगताप या आरोपीला कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या पथकाने इंदापूर तालुक्यातील न्हावी येथून ताब्यात घेतले. गंगाधर याने कर्जत कारागृहातून पळाल्यानंतर पिंपळवाडी गावातील एका ऊसतोड कामगाराची दुचाकी चोरल्याचे सांगितले आहे.पोलिसांनी तिन आरोपींना अटक केली असून पोलीस उर्वरित आरोपींचा तपास करीत आहेत.
(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading