एल्गार परिषदेचा तपास NIA कडे देण्याचे पुणे न्यायालयाचे आदेश.

दिनांक १५ फेब्रुवारी,पुणे:
पुण्यात 31 डिसेंबर 2017 ला झालेल्या एल्गार परिषदेचा तपास NIA कडे देण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत.
पुणे शहर पोलिसांनी नावंदर कोर्टात गुन्ह्याची कागदपत्र मुंबई NIA विशेष न्यायालयात पाठविण्यासाठी ना हरकत पत्र दिलं आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व आरोपींना मुंबईच्या NIA कोर्टात हजर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.
दरम्यान गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना अंतरिम जामीन देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. मात्र, दोघांनाही अटकेसंदर्भात दिलासा मिळालाय. आजपासून (14 फेब्रुवारी) पुढील चार आठवडे नवलखा आणि तेलतुंबडेंना अटक करता येणार नाही. दरम्यानच्या काळात हे दोघेही सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात.
अटकपूर्व जामिनासाठी नवलखा आणि तेलतुंबडेंनी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. मात्र, न्या. पी. डी. नाईक यांनी त्यावरील आदेश 18 डिसेंबर 2019 रोजी राखून ठेवली होता.
एल्गार परिषद काय आहे?
1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव इथं 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या नेतृत्वाखालील सैन्यात झालेल्या लढाईला 200 वर्षं पूर्ण झाली. कंपनी आर्मीमध्ये असलेल्या महार रेजिमेंटच्या सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळे पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याचा पराभव झाला.
ब्रिटिशांनी उभारलेल्या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिल्यामुळे दरवर्षी 1 जानेवारीला इथं मोठा कार्यक्रम होतो ज्याला देशभरातून लाखो दलित अनुयायी जमतात.
या विजय दिवसाच्या आदल्या दिवशी, म्हणजे 31 डिसेंबर 2017 ला, विविध संघटनांनी पुण्यातल्या शनिवारवाड्यावर ‘भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियाना’ अंतर्गत ‘एल्गार परिषदे’चं आयोजन केलं होतं.
‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, देश वाचवा’ या ब्रीद वाक्याखाली झालेल्या या परिषदेचं उद्घाटन रोहित वेमुलाच्या आई राधिका वेमुला यांच्या हस्ते झालं. त्यांच्यासोबतच ‘भारिप बहुजन महासंघा’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, गुजरात विधानसभेतले आमदार जिग्नेश मेवाणी, ‘जेएनयू’मधील विद्यार्थी नेता उमर खालिद, आदिवासी कार्यकर्त्या सोनी सोरी हेही या परिषदेत सहभागी झाले होते. भाषणांसोबत ‘कबीर कला मंच’ आणि इतर संस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळेस झाले होते.
भीमा-कोरेगाव हिंसाचार
एल्गार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2018 पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगावमध्ये विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा होत असतांनाच सणसवाडी आणि परिसरात हिंसाचाराला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ झाली. अनेक जण जखमी झाले आणि एका तरूणाचा मृत्यूही झाला. या हिंसाचाराचे पडसाद देशभर उमटले.
भीमा कोरेगावातील हिंसाचाराच्या घटनेबाबत हिंदुत्ववादी नेते ‘समस्त हिंदू आघाडी’चे मिलिंद एकबोटे आणि ‘शिवप्रतिष्ठान’चे संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ज्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.
तर इकडे ‘एल्गार परिषदे’बाबत पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल झाले.
एक गुन्हा जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्यावर प्रक्षोभक भाषण देण्याच्या आरोपावरून झाला, तर दुसरा गुन्हा तुषार दामगुडे यांच्या तक्रारीवरून ‘एल्गार परिषदे’शी संबंधित इतर व्यक्तींवर दाखल झाला.
आतापर्यंत कुणावर कारवाई
6 जून 2018 ला पुणे पोलिसांनी दलित कार्यकर्ते सुधीर ढवळे, नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुख शोमा सेन, कार्यकर्ते महेश राऊत व केरळच्या रोना विल्सन यांना अटक केली.
28 ऑगस्ट 2018 ला महाराष्ट्र पोलिसांनी तेलुगू कवी वरवरा राव यांना हैदराबादमधून, व्हनरेन गोन्सालविस व अरूण फरेरा यांना मुंबईतून, सुधा भारद्वाज यांना फरिदाबाद इथून तर नागरी कार्यकर्ते गौतम नवलाखा यांना दिल्लीतून अटक करण्यात आली.
(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading