बेलवंडीत उभारले जाणार भव्य दारूगोळा निर्मिती संकुल; श्रीगोंदा तालुक्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना..

दिनांक १९ मे २०२६,श्रीगोंदा:

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे राज्य शासनाच्या सहकार्याने भव्य दारूगोळा निर्मिती संकुल उभारण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. सुमारे ६०० एकर जागेवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे श्रीगोंदा तालुका औद्योगिक नकाशावर ठळकपणे झळकणार असून, संरक्षण क्षेत्रातील मोठी गुंतवणूक या भागात येणार आहे.


या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत टीएनटी (TNT), आरडीएक्स (RDX) आणि एचएमएक्स (HMX) यांसारख्या उच्च क्षमतेच्या स्फोटकांचे उत्पादन करणारे अत्याधुनिक कारखाने उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे २ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली असून, त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


दरवर्षी तब्बल २० हजार टन टीएनटी उत्पादन क्षमता विकसित करण्यात येणार असून, सरकारी आणि खासगी क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठ्या उत्पादन क्षमतेच्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेला दारूगोळा आणि स्फोटक साहित्य देशांतर्गत स्तरावर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे बेलवंडी आणि परिसरातील रस्ते, वीज, पाणीपुरवठा तसेच इतर पायाभूत सुविधांचा विकास होण्याची शक्यता आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, उद्योगांनाही चालना मिळणार आहे.

त्यामुळे श्रीगोंदा तालुक्याच्या आर्थिक विकासात या प्रकल्पाची मोठी भूमिका राहणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटक निर्मिती प्रकल्प उभारला जात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक उपाययोजना, पर्यावरणीय नियमांचे पालन आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली आहे.

स्रोत:(Dio)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading