दिनांक ८ ऑक्टोबर २०२५, शहापूर/पारनेर:
शहापूर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील खैरे गाव हद्दीतील शेणवा येथील आदिवासी कातकरी समाजातील एका अल्पवयीन मुलीचा तिच्याच वडिलांनी सौदा करून, तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

विवाहाचा कट श्रमजीवी संघटनेने उधळून लावला आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीचे वडील हे कुटुंबाच्या अत्यंत बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे हतबल झाले होते. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रकाश मुकणे नावाच्या दलालाच्या मध्यस्थीने मुलीचा विवाह जय लक्ष्मण शिर्के (रा. बाबुलवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याच्याशी ठरवण्यात आला होता.
या घृणास्पद व्यवहारात मुलीच्या बदल्यात तिच्या पालकांना ₹५० हजार देण्याचे ठरले होते. त्यापैकी ₹१० हजार रक्कम रोख स्वरूपात एक महिन्यापूर्वीच देण्यात आली होती.

आरोपी जय लक्ष्मण शिर्के आणि त्याचे वडील लक्ष्मण शिर्के हे उच्चवर्णीय समाजातील असून, पीडित मुलगी अल्पवयीन आणि अनुसूचित जमातीतील आहे.. हे त्यांना पूर्णपणे माहीत होते.

तरीही त्यांनी तिच्या कुटुंबाच्या गरिबीचा गैरफायदा घेत मुलीची विक्री करून जबरदस्तीने विवाह लावण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणामुळे आदिवासी कातकरी समाजातील गरीब कुटुंबांना फसवून मुलींची खरेदी-विक्री करण्याची ही घृणास्पद पद्धत पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी शासनाकडे अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
