दिनांक १ मे २०२६ श्रीगोंदा (प्रतिनिधी):
श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थनगर परिसरात असलेल्या ‘राजधानी हॉटेल’ मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध आणि अश्लील व्यवसाय सुरू असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

या प्रकारामुळे परिसरातील सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी सिद्धार्थनगरमधील समाज बांधवांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, ‘राजधानी हॉटेल’ मध्ये मागील काही काळापासून अश्लील उद्योग सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी अल्पवयीन मुली आणि महिलांना अशा कामांसाठी आणले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रहिवाशांनी या संदर्भातील व्हिडिओ चित्रीकरण देखील पुरावा म्हणून उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.

सदर ‘राजधानी हॉटेल’ हे भर लोकवस्तीत आहे. यामुळे परिसरातील माता-भगिनी आणि शालेय विद्यार्थिनींना येण्या-जाताना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांनी हॉटेल मालक सुनील ढवळे यांना हा प्रकार थांबवण्याबाबत वारंवार समज दिली. मात्र, सुधारण्याऐवजी मालकाने स्थानिकांनाच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘राजधानी हॉटेल’ वर तात्काळ छापा टाकून व्हिजिटर रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी., हॉटेलमध्ये येणाऱ्या अल्पवयीन मुलींची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी., परिसरातील शांतता भंग करणाऱ्या या हॉटेलचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा.
यावेळी परसराम घोडके, श्रीकांत घोडके, प्रेम घोडके, पप्पू घोडके यांच्यासह सिद्धार्थनगरमधील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

जर स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ‘राजधानी हॉटेल’ वर त्वरित कारवाई केली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालय आणि वरिष्ठ पोलीस कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयालाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
हॉटेल मालक सुनील ढवळे यांचे स्पष्टीकरण–
या सर्व आरोपांबाबत ‘राजधानी हॉटेल’ चे मालक सुनील ढवळे यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला असता, त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ढवळे म्हणाले की,
”मी शिव-फुले-आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता असून समाजातील सर्व हितकारक उपक्रमांमध्ये माझा सक्रिय सहभाग असतो. माझ्यावर होत असलेले आरोप हे वैयक्तिक रोषापोटी केले जात आहेत. लॉजवर केवळ कायदेशीर आणि प्रौढ (मॅच्युअर) जोडप्यांनाच रीतसर रजिस्टर नोंदणी करून प्रवेश दिला जातो. तरीही, माझ्या उद्योगामुळे जर कोणाला खरोखर त्रास होत असेल, तर मी तो बंद करायलाही तयार आहे.”
स्रोत:(तक्रारी अर्ज)
AI चा वापर करून फोटो तयार केला आहे.















Leave a Reply