दिनांक २९ एप्रिल २०२६,श्रीगोंदा :
भटके विमुक्त आदिवासी समुदायामध्ये युवक नेतृत्व विकास आणि भारतीय संविधानिक मूल्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने 2023 ते 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये कार्यरत असलेले आदिवासी कार्यकर्ते संतोष भोसले यांचा गौरव करण्यात आला.
या प्रकल्पाच्या माध्यमातून समुदायातील युवक, महिला आणि किशोरवयीन मुलांमध्ये सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली.
वंचित व उपेक्षित घटकांच्या हक्क, अधिकार ,सन्मान आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत विविध भागांमध्ये प्रभावी समाजपरिवर्तन घडवून आणण्यात आले. तसेच समुदाय आणि व्यवस्थेमधील दुवा म्हणून काम करत नेतृत्वक्षम प्रतिनिधित्व निर्माण करण्यातही या उपक्रमाने महत्त्वपूर्ण योगदान दिले.
प्रकल्पाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ईकोनेट, पुणे संस्थेच्या गौरीताई भोपटकर, राहुल साळवी, सुनिता देशमुख, क्रांती डबीर, स्वप्नील नेवाळे, विंदा महाजन यांच्या हस्ते संतोष भोसले यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक करत समाजपरिवर्तनासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करण्यात आली. संतोष भोसले यांनी आपल्या कामातून भटके विमुक्त आदिवासी समाजातील नेतृत्वाला नवी दिशा देत परिवर्तनाची प्रेरणा निर्माण केली आहे.
जे आपण सोसले ते समाजाने सोसू नये यासाठीच सामाजिक कार्यात सक्रिय झालो, याकामी आई वडिलांनी शिक्षण दिले, वयाच्या तेराव्या वर्षी व्यसन सोडून शाळेत दाखल झालो आणि सामाजिक कार्यात २०१७ पासून आलो, सामाजिक कार्यात ईकोनेट, पुणे संस्थेने मातीच्या गोळ्याला आकार द्यावा तसे मला विविध पातळीवर शून्यातून घडवले आणि वयाच्या आठव्या वर्षी व्यसनाधीन शाळा बाह्य मुलाला कार्यकर्ता म्हणून ओळख दिली आणि त्याच कार्यकर्त्याचा आज सन्मान केला असे मत संतोष भोसले यांनी व्यक्त केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
