श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील कर्मचारीच वेश्या व्यवसायाचा ‘पार्टनर’.? .., कायद्याच्या रक्षकांकडूनच नियमांचा भंग.!

दिनांक ४ मे २०२५ | श्रीगोंदा:

माजी व विद्यमान आमदार पाचपुते यांच्या गावातच वेश्याव्यवसाय फोफावला – काष्टीतील चित्र तालुक्याला लाजवणारे.!

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावामध्ये अनधिकृत वेश्याव्यवसाय उघडपणे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्थानिक नागरिकांकडे केलेल्या चौकशीत अनेक हॉटेलमधील ही गैरप्रकरणे उघड झाली आहेत. विशेष म्हणजे या अवैध धंद्याचे संरक्षण करत हप्ता वसुली करण्याचे काम श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या कर्मचाऱ्यास केवळ हप्ता मिळतो असे नाही, तर त्याला त्या हॉटेल्समधून चमचमीत मेजवानीही दिली जाते. त्यामुळे साहेबांची स्थिती “पाचही बोटं तुपात” अशी झाली आहे, अशी जोरदार कुजबुज ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

या धक्कादायक प्रकारात आणखी एक ट्विस्ट म्हणजे, श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील आणखी एक कर्मचारी थेट या वेश्याव्यवसायात ‘पार्टनर’ असल्याची अधिकृत माहिती देखील समोर आली आहे. पोलीस दलातीलच काहीजण असे अवैध धंदे चालवणाऱ्यांना संरक्षण देत असतील, तर मग कायद्याचा धाक राहणार कुठे, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.

उन्हाळ्याचे चटके सामान्य नागरिक सहन करत असताना, हप्ता वसुलीसाठी या पोलीस कर्मचाऱ्यांकडे एसी गाड्या उपलब्ध आहेत. त्यातच हॉटेल्समध्ये एसी खोल्यांमध्ये ‘विश्रांती’ मिळत असल्याने या मंडळींची ऐशोआरामात वावर वाढलेली दिसून येते. काहींनी तर व्यंगात्मक भाषेत म्हटले आहे की, “आता केवळ पोलिस स्टेशनमध्येच एसी बसवायचा राहिला आहे!”

या प्रकरणात विशेष म्हणजे काष्टी हे गाव माजी आमदार आणि सध्या विद्यमान आमदार पाचपुते यांचेही गाव आहे. त्यामुळे त्यांच्या गावात असे लज्जास्पद आणि बेकायदेशीर प्रकार सुरू असणे हे तालुक्याच्या जनतेसाठी अत्यंत लाजिरवाणे आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता ग्रामस्थांसह सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

स्रोत:(खात्रीशीर माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading