श्रीगोंदा, ५ मे २०२५:
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरात काल (४ मे) रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना आढळगाव कार्यक्षेत्रातील बारानंबर चारीजवळ घडली असून, मृतांमध्ये रोहित शिंदे (वय २२) आणि अतुल शिंदे (३०) यांचा समावेश आहे.

या अपघाताबाबत माहिती मिळताच गणेश शिंदे(४४), (रा.आढळगाव) यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तातडीने खबर दिली.

त्यांच्या दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास रोहित शिंदे व अतुल शिंदे हे दोघे बारा नंबर चारीजवळ असताना त्यांना एका वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघात घडल्यानंतर लगेच त्यांना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघेही उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.

या घटनेने आढळगाव गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तरुण वयात दोन जीव गमावावे लागल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलिस पुढील तपास करीत आहेत.
— स्रोत:(खबर)


