गोवंश तस्करी : ४३ गोऱ्हे बेकायदेशीर वाहतूक करणारी पिकअप गाडी पकडली, चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार..

बेलवंडी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) | दि. ५ मे २०२५:

महाराष्ट्रात गोवंश हत्येवर बंदी असतानाही, काहीजण बेकायदेशीररीत्या गोवंश जनावरांची वाहतूक करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दिनांक ४ मे रोजी रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास, शिरूर ते विसापूर जाणाऱ्या रस्त्यावर ढवळगाव शिवारात रामबाबा मंदिराजवळ महिंद्रा पिकअप गाडीतून ४३ गोऱ्हे बेकायदेशीर वाहतूक करत असलेल्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला.

फिर्यादी गणेश विलास धुमाळ (वय ३४, धंदा – ड्रायव्हर व शेती, रा. मुंगुसगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीत (MH 12 LT 0764) १० ते १५ दिवसांचे अंदाजे ४३ जर्शी गायीचे गोऱ्हे वाहून नेण्यात येत होते. फिर्यादीने ही बाब लक्षात येताच गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडीवरील अज्ञात चालक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून गेला.

या पिकअप गाडीची अंदाजित किंमत रु. ८०,०००/- असून त्यामध्ये असलेल्या जनावरांची किंमत सुमारे रु. ४३,०००/- असल्याचे समजते. एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे रु. १०३०००/- आहे.

या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गु. रजि. नं. १५०/२०२५ नुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम ५(अ)(१)(९), प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम ११, आणि मोटार वाहन कायदा कलम ६६(१)/१९२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास मा. पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली मपोना अविंदा जाधव करत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोहे का जावेद शेख यांनी केली.

सदर प्रकारामुळे गोवंश जनावरांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित झाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध सुरू असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading