दिनांक २२ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा (अहिल्यानगर):
टाकळी कडेवळीत येथील बसस्टॅण्डवर मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास जुन्या आर्थिक व्यवहारातून एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण करताना जातीवाचक शिवीगाळ केल्याने आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण आंबादास सोनवणे (वय ४६, रा. टाकळी कडेवळीत) हे बसस्टॅण्डवर बसले असताना विलास मोहन पोटे हातात गज घेऊन तेथे आला.

मागील चार वर्षांपूर्वी गहू पेरणीचे राहिलेले ५०० रुपये द्यायाची मागणी त्याने सोनवणे यांच्याकडे केली. मात्र, सोनवणे यांनी ‘मी त्याच वेळी सर्व पैसे दिले आहेत,’ असे सांगितल्याने विलास पोटे याला राग आला.

रागाच्या भरात त्याने लक्ष्मण सोनवणे यांची गचांडी धरून त्यांचा शर्ट फाडला आणि त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने हातातील गजाने सोनवणे यांच्या उजव्या गुडघ्यावर मारहाण करून त्यांना दुखापत केली.

यावेळी विलास पोटे याचा मुलगा आदित्य विलास पोटे हा देखील तेथे आला. त्याने लक्ष्मण सोनवणे यांच्या तोंडावर लाथांनी मारहाण केली.

या दोघांनी मारहाण करून ‘जर परत आमच्या नादी लागला तर जिवे ठार मारून टाकू’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

जुन्या आर्थिक वादातून झालेल्या या मारहाणीत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याने, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विलास मोहन पोटे आणि आदित्य विलास पोटे यांच्याविरुद्ध

भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहिती)

Advertise…
