दिनांक १९ नोव्हेंबर, श्रीगोंदा:
छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने गडकिल्ल्यांवर ब.मो. पुरंदरेंच्या अस्थि टाकण्यात येऊ नये. असे निवेदन तहसिलदार श्रीगोंदा यांच्या मार्फत मा.राज्यपाल, महाराष्ट्र यांना पाठवण्यात आले.
त्यात असे म्हटले आहे की, नुकतेच ब.मो.पुरंदरे यांचे निधन झाले. या व्यक्तीने कथा नाटकांतून राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शहाजी राजे यांच्या चारित्र्याचे हनन केले आहे. तसेच, लेखनाच्या माध्यमांतून धार्मिक द्वेष पसरवण्याचे काम केले आहे.

वर्तमानपत्रातील काही बातम्यांनुसार या व्यक्तीच्या अस्थी गडकोटांवर टाकण्याचे षडयंत्र काही राजकीय पक्ष संघटना करत आहेत. त्यातून ब.मो. पुरंदरेंचे उदात्तीकरण करून गडांवर भविष्यात स्मारक बनवण्याचा दुष्ट हेतू दिसत आहे. आधीच पुरंदरेंच्या कलम-कसाई लेखनाने शिवप्रेमींमध्ये असंतोषाची भावना आहे. त्यात पुन्हा या अस्थि टाकून गडकोटांचे पावित्र्य कोणी भंग करणार असेल..! तर, शिवप्रेमी आता गप्प बसणार नाहीत.
कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शासन प्रशासनाने अशा खोडसाळपणा करणाऱ्या पक्ष संघटना, व्यक्तींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा शिवप्रेमी, छत्रपती क्रांती सेना तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर शासन व पुरातत्व विभागाच्या विरोधात संविधानिक पद्धतीने कठोर आंदोलनाची भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे. सदरील निवेदन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, पुरातत्व विभाग नवी दिल्ली व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनाही पाठवले आहे.

निवेदन सादर करताना छत्रपती क्रांती सेनेचे समीर शिंदे, सचिन भोसले, भारत शिंदे, दादा शिंदे, बहुजन क्रांती मोर्चाचे सुरेश रणनवरे, बहुजन मुक्ती पार्टीचे संजय सावंत, शहराध्यक्ष सुभाष बोराडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(निवेदन)
