दिनांक २२ नोव्हेंबर, श्रीगोंदा:
येळपणे गावातील शाळकरी मुलाचा विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे दुर्देवी अंत झाला आहे. त्यामुळे संपूर्ण येळपणे गावावर व लकडे परिवारावर कधीही भरून न निघणारा दुःखाचा आघात झालेला आहे.
सविस्तर वृत्त असे की, येळपणे गावातील ठाणगे वाडी येथील अभिषेक बाळू लकडे (वय ११) हा विहिरीच्या कडेला असलेल्या बोराच्या झाडाला बोरे काढण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला व त्यामध्ये त्याचे निधन झाले.

तो बराच वेळ झाला. तरी, घरी न आल्यामुळे त्याचा शोधाशोध घेतल्यावर विहिरीच्या कडेला त्याची चप्पल दिसून आली. संशय आल्यामुळे बांबूच्या सहाय्याने विहिरीमध्ये पाहिले असता, विहिरीत असल्याचे शंका बळावली. शोध घेतला असता, तो विहिरीत आढळून आला.
अभिषेकअ मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले. दिनांक २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता अभिषेकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिषेक श्री.खंडेश्वर माध्यमिक विद्यालय येळपणे येथे इयत्ता सहावी मध्ये शिकत होता. तो अत्यंत हुशार होता व चांगल्या स्वभावाचा मुलगा होता. अभिषेकचे वडील हे शेती करतात तर, आईचे दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे लकडे कुटुंबावर हा दुहेरी आघात झालेला आहे.

येळपणे गावचे सरपंच किरण धावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलदादा वीर, कुकडी सह.सा.का.संचालक आबा पाटील पवार, ग्रा. पंचायत सदस्य भाऊसाहेब पवार, प्रा.लकडे सर, खंडेराव शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, अभिषेक चे सर्व शिक्षक सह अनेक जणांनी लकडे कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे.
स्रोत:(पत्रकार अमोल बोरगे)
