दिनांक ३० जुन २०२५ श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून पाण्याचा हंडा भरताना विहिरीत पडून एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना दिनांक २९ जून २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

हरीराम बेचन गौतम (वय ६४ वर्ष, मुळ गाव बिचपरी, हसुलिया मोतीपूर, जि. बहराईच, उत्तर प्रदेश) हे सध्या आपल्या कुटुंबासह लोणी व्यंकनाथ येथे राहत असून राजेंद्र झुंबर काकडे यांच्या द्राक्ष बागेत मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. घटनेच्या दिवशी त्यांची मुलगी शिवानी ही पाण्यासाठी शेजारील विहिरीवर गेली होती.

येथील विहिरीवर पाण्याचा हंडा भरताना शिवानीचा तोल गेल्याने ती थेट विहिरीत कोसळली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लहान मुलांनी आरडाओरड केल्याने तिचे आई-वडील घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने शोध सुरू केला, मात्र रात्री उशिरा काहीही निष्पन्न झाले नाही.

सकाळी दिनांक ३० जून रोजी विहीरीत मृत्यू अवस्थेत शिवानीचा मृतदेह आढळून आला. तिच्या चेहऱ्यावर जलचर प्राण्यांनी केलेल्या कुरतडीच्या खुणा आढळून आल्या असून तिच्या तोंडातून रक्तस्त्राव होत असल्याचे निदर्शनास आले.

तत्काळ तिला खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, लोणी व्यंकनाथ परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शिवानीच्या अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे.
स्रोत:(खबर)
