कोळगावला अवकाळीचा जोरदार तडाखा.. अनेक घरांवरचे पत्रे उडाले .. फळबागांचे नुकसान.. जनावरांना जखमा..

दिनांक २० मे २०२४, श्रीगोंदा:

सायंकाळी साडेतीनच्या सुमारास कोळगावला जोरदार वादळासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. त्यामध्ये कोळगाव परिसर व वाड्यावस्त्यावरील अनेक घरांचे पत्रे उडाले, काही इसमांना व जनावरांना जखमा झाल्या.. तर, मोठ्या प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले. कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड व मंडल अधिकारी जाधव साहेब यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. परंतु दोन दिवसापासून कोळगावला अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याकरता कोळगावचे तलाठी अनुपस्थितीत आहेत. त्यामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे.

आज सायंकाळी साडेतीनच्या सुमारास अचानक जोरदार सोसायटीच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामध्ये भयानक वादळाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वादळाचा एवढा वेग प्रचंड होता की, निंबाळकर यांच्या घरावरचे पत्रे ८०० ते १००० फूट दूर अंतरावर जाऊन पडले. काही पत्रे घरावरून उडून आसमंतामध्ये उडाले. तर, पत्र्यांमुळे माणसे तसेच जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

तनपीरे मळा येथील प्रशांत गुंजाळ यांच्या हाताला घरावरचे पत्रे उडाल्याने जखम झाली. बापू गुंजाळ यांना पत्र्यावरील दगड लागल्याने जखम झाली. तर, हरी गुंजाळ, नंदू लगड, तसेच, जगताप मळा येथील मोहन जगताप, पप्पू गुंजाळ, गणेश निंबाळकर, राजू बांदल, गोटू शेलार, मोहन लगड, प्रदीप कलगुंडे, सुरेश धोत्रे यांच्या घरावरील पत्रे उडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शरद दरेकर यांच्या घरावरील पत्रे उडून गाईला पत्रा लागल्याने मोठे जखम झाली आहे. कन्हेरमळा येथील लक्ष्मीकांत लगड यांच्या डाळिंब व आंबे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचबरोबर आणखीही नागरिकांचे नुकसान झाले आहे. अनेक झाडे, विजेचे खांब उनमळून पडले, गाई गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुकानांवरील फ्लेक्स बोर्ड होर्डिंग बॅनर यांचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळबागांमध्ये फळांचा सडा पडला. घरांवरील पत्रे उडाल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.

या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड, मंडल अधिकारी जाधव साहेब त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य विलास शितोळे, निखिल लगड, संजय जगताप, अमोल भापकर, अविनाश पवार, नितीन नलगे, योगेश बांदल हे उपस्थित होते.

कोळगाव तलाठ्यांची अनुपस्थिती…

कोळगाव येथील तलाठी काळे हे गेल्या दोन दिवसापूर्वी अवकाळी मुळे झालेल्या घरांचे नुकसानीचे पंचनामे करण्याकरता वारंवार ग्रामस्थांनी मागणी करूनही तलाठी काळे हे अनुपस्थितीत राहिले आहेत. त्यांच्या गैरहजेरीमुळे दोन दिवसापासून गावातील नुकसानीचे पंचनामे होऊ शकले नाही. काळे तलाठी वारंवार कार्यालयामध्ये अनुपस्थितीत राहतात. त्यामुळे कोळगाव सारख्या मोठ्या गावांचे मोठे नुकसान होत आहे याची वरिष्ठांनी दखल घ्यावी.. अशी मागणी केली. तसेच आज झालेल्या नुकसानीमध्ये विविध अधिकाऱ्यांनी तातडीने पडलेले काम उभे करून विजेची दुरुस्ती करावी व वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे .

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading