“छातीत आणि डोक्यात गोळ्या, स्वतःचीच सर्व्हिस रिव्हॉल्वर..२४ वर्षांनंतरही पीआय नामदेव शिंदेंचा मृत्यू ‘गुलदस्त्यात’च;. “आमदार पाचपुते साहेब तत्कालीन पीआय नामदेव शिंदे मृत्यू प्रकरणाचाही फेरतपास करा..!

दिनांक २५ मार्च २०२६,अहिल्यानगर/श्रीगोंदा:

जिल्ह्यातील पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या सुमन काळे यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू आणि त्या प्रकरणातील तपासातील तफावत यावर आमदार विक्रम पाचपुते यांनी नुकतेच विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले.

पाचपुते यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आदिवासी पारधी समाजात समाधानाचे वातावरण असतानाच, आता श्रीगोंदा तालुक्यातील एका जुन्या पण अत्यंत गूढ प्रकरणाच्या चौकशीची चर्चा जोर धरू लागली आहे.

जामखेड पोलिसांनी चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या सुमन काळे यांचा पोलिसांच्या बेकायदेशीर मारहाणीत मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला आहे.

यावर बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की, “अध्यक्ष महोदय, सुमन काळे या केवळ एक महिला नसून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून, बेकायदेशीरपणे डांबून ठेवून मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्यांचा जीव गेला. या तपासात मोठी तफावत असून, सरकारने याची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.” त्यांच्या या मागणीचे संपूर्ण जिल्ह्यात स्वागत होत आहे.

सुमन काळे प्रकरणाप्रमाणेच श्रीगोंदा तालुक्यातील एका अत्यंत संवेदनशील आणि गुढ प्रकरणाबाबत आता जनतेतून आवाज उठवला जात आहे. २००२ च्या सुमारास श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा झालेला आकस्मिक मृत्यू आजही एक मोठे प्रश्नचिन्ह आहे.

काय होते ‘पीआय नामदेव शिंदे’ प्रकरण?

श्रीगोंद्यात कर्तव्यावर असताना नामदेव शिंदे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्याच सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून त्यांच्या छातीत आणि डोक्यात गोळ्या लागल्या होत्या.

ही घटना नक्की कशी घडली? आत्महत्या की घातपात? याचे सत्य २३.. २४ वर्षांनंतरही गुलदस्त्यात आहे. एखाद्या सस्पेन्स चित्रपटाच्या कथेला लाजवेल असा हा घटनाक्रम आजही लोकांच्या स्मरणात आहे.

काही सामाजिक कार्यकर्ते या प्रकरणावर सातत्याने पाठपुरावा करत असले, तरी अद्याप ठोस वस्तुस्थिती समोर आलेली नाही. ज्या पद्धतीने आमदार विक्रम पाचपुते यांनी सुमन काळे यांच्यासाठी भूमिका घेतली, तशीच भूमिका त्यांनी पीआय नामदेव शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणाबाबतही घ्यावी, अशी मागणी श्रीगोंद्यातील जनतेकडून केली जात आहे.

एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचा स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून गोळ्या लागून मृत्यू होणे आणि त्याचा तपास तडीस न जाणे, हे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल फेरचौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading