कॉलेज प्राचार्य, रेक्टर आणि शिक्षकांविरोधात विद्यार्थिनीचा गंभीर आरोप; FIR मध्ये सहआरोपी करण्याची मागणी..
श्रीगोंदा (दि. १६ सप्टेंबर २०२५):
श्रीगोंदा येथील सोनीया गांधी पॉलिटेक्नीक महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर दोन वर्षांपासून सुरू असलेल्या मानसिक व शारीरिक शोषण प्रकरणात कॉलेजचे प्राचार्य, होस्टेल रेक्टर तसेच अन्य शिक्षक सहभागी असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

विद्यार्थिनीने यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरोधात FIR नोंदवली होती. तथापि, या FIR मध्ये प्राचार्य अमोल नागवडे, रेक्टर नागने सर व नागने मॅडम, गोलाडे सर तसेच प्रशांत थोरात या सर्वांचा समावेश करण्यात आलेला नाही, अशी तक्रार विद्यार्थिनीने अर्जाद्वारे पोलिसांकडे नोंदवली आहे.

तक्रारीनुसार, या सर्वांना विद्यार्थिनीवर होत असलेल्या अत्याचाराची माहिती असूनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, उलट धमकावून तिला गप्प बसविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या सर्वांना सहआरोपी करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थिनीने केली आहे.

तसेच, “माझ्या अर्जातील मागणीवर जर पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही तर माझ्या जीवाला काहीही झाले तर यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील,” असा इशाराही विद्यार्थिनीने आपल्या निवेदनात दिला आहे.

तक्रारीनुसार गुन्हे दाखल:
अमोल नागवडे, रेक्टर नागने सर व नागने मॅडम, गोलाडे सर तसेच प्रशांत थोरात यांच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.
प्राचार्य-शिक्षक निर्दोष असल्याचा विद्यार्थ्यांचा दावा; श्रीगोंदा पोलीस स्टेशनसमोर आंदोलनाची तयारी..?
सोनीया गांधी पॉलिटेक्नीक कॉलेजचे प्राचार्य, रेक्टर व काही शिक्षकांवर दाखल गुन्हे हे चुकीचे असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. संबंधित प्राध्यापकांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याने त्यांची निर्दोष सुटका करावी, अशी मागणी होत असून लवकरच श्रीगोंदा पोलीस स्टेशनसमोर विद्यार्थी आंदोलन करणार असल्याचे समजले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
