श्रीगोंदा, दि. १८ सप्टेंबर २०२५ :
श्रीगोंदा तालुक्यातील नामांकित सोनिया गांधी पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीचे शारीरिक व लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीचा १६४ चा जबाब नोंदवून प्राचार्य, रेक्टर आणि काही शिक्षकांवरही सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले.

मात्र, या गुन्ह्यांची नोंद चुकीच्या पद्धतीने व निरपराध व्यक्तींवर झाल्याचा आरोप करत आज विद्यार्थ्यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. “खरे आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे; पण निर्दोषांना यात अडकवू नये” असे स्पष्ट मत आंदोलनात उपस्थित अनेक विद्यार्थ्यांनी नोंदवले. या मोर्चात शेकडो विद्यार्थी व काही शिक्षक सहभागी झाले होते.

अल्पवयीनांचा सहभाग वादग्रस्त:
आंदोलनात मोठ्या संख्येने अल्पवयीन विद्यार्थी सहभागी झाल्याचे उघडकीस आले. पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता शिक्षकांची तारांबळ उडाली. पालकांची परवानगी न घेता अल्पवयीन मुलांना आंदोलनात कसे सामावून घेतले, हा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे या आंदोलनाची कायदेशीर बाजू चर्चेत आली.

आंदोलनात कृत्रिम भाषण व राजकारणाचे सावट:
काही विद्यार्थिनींनी आंदोलनावेळी आपले मत नोंदवताना “संस्थेची प्रतिष्ठा मलीन झाली आहे, त्यामुळे कोणीतरी या प्रकरणाचे राजकारण करत आहे” असे मत व्यक्त केले. त्यामुळे आंदोलन कृत्रिम व राजकीय प्रेरित असल्याचे भासले.
उलटसुलट चर्चा:
आंदोलनाचा नेमका हेतू आरोपींना शिक्षा व्हावी हा आहे..? की पीडितेला न्याय मिळावा हा आहे?, यावर परिसरात उलटसुलट चर्चा रंगली. पालकांना सूचना न देता अल्पवयीन मुलांचा सहभाग झाल्यानेही वातावरण चांगलेच तापले.

निवेदन प्रशासनाकडे:
या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. घोषणाबाजी करत “आरोपींवर कारवाई व निरपराधांना न्याय द्यावा” अशी मागणी करण्यात आली.
य प्रकरणामुळे शिक्षक-विद्यार्थी या पवित्र नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
स्रोत:(आयोजित आंदोलन)
