श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; वहीत लिहिलेली ‘सुसाईड नोट’ आढळली – परप्रांतीय वधू आणण्याच्या रॅकेटची चर्चा..!

श्रीगोंदा, दिनांक १९ सप्टेंबर २०२५:

#Humantrafficking,#sucide Note, #shrigonda …

श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक येथून सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विवाह स्थानिक बावीस वर्षीय गतिमंद युवकासोबत करण्यात आला होता. या विवाह सोहळ्याचे आयोजन गावातील एका जबाबदार मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून झाले होते. या विवाह प्रसंगी विविध सामाजिक प्रक्रियेतील पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती आहे.

मात्र काही दिवसांपूर्वी या मुलीचा मृतदेह घरात दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. संशयास्पद परिस्थितीत आढळलेल्या या घटनेने गावात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली. मृतदेहाजवळून कानडी भाषेत लिहिलेली एक वहीतील सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून त्यात लिहिले आहे –

“ನನ್ನ ಹೃದಯವನ್ನ ನೋಡುವವನು ನಿನ್ನ ಹೃದಯವನ್ನ ಕಾಣುತ್ತಾನೆ”

(मराठीत अर्थ: “माझं हृदय पाहणारा तुझं हृदय पाहतो.”) साधारण तीन ओळींच्या या सुसाईड नोटमुळे घटनेच्या तपासाला अधिक गांभीर्य आले आहे.

मृत मुलीचा पती व त्याचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे. या कुटुंबात आलेल्या मुलीच्या ओळखीबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे समजते. इतकेच नव्हे तर, गावात अशा प्रकारे परप्रांतीय मुली विवाह करून आणल्या गेल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. त्यामुळे या मागे मुलींच्या विवाहाद्वारे मानवी तस्करीसारखे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदर प्रकरणी श्रीगोंदा पोलीसांनी तपास सुरू केला असून, लवकरच या घटनेमागची वस्तुस्थिती उघड होईल अशी माहिती मिळत आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading