दिनांक २० सप्टेंबर २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंद्यातील महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली आहे. नुकतेच घडलेले सोनिया गांधी पॉलिटेक्निकल लैंगिक शोषण प्रकरण ताजे असतानाच, आज शहराच्या पश्चिम दिशेला असलेल्या दोन नामांकित महाविद्यालयांच्या गेटसमोर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सदर घटनेदरम्यान, तेथील सुरक्षारक्षक आणि एका पालकाच्या प्रसंगावधानामुळे हा प्रयत्न फसला. मात्र, या दरम्यान जमलेल्या नागरिकांच्या उपस्थितीत आरोपी तरुणाने पालक आणि सुरक्षारक्षकांना धमकावत घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.

यातील एका महाविद्यालयीन प्राचार्यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तथापि, पोलीस प्रशासन अद्यापही ॲक्शन मोडवर नसल्याची भावना पालक व स्थानिकांमध्ये आहे.

दरम्यान, वाढत्या अशा घटनांमुळे महाविद्यालयीन व शाळकरी तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला असून, दोन्ही महाविद्यालयीन प्राचार्यांनी यासंदर्भात पोलीस प्रशासनाला औपचारिक पत्रव्यवहार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या प्रकारामुळे श्रीगोंद्यात शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
