श्रीगोंद्यात दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीवेळी भावाबहीणीत हाणामारी; पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला..

दिनांक ५ मार्च २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात काल दुपारी खरेदीसाठी आलेल्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. विशेष म्हणजे, ही झटापट  भावाबहीणीमध्येच झाली असून, प्रॉपर्टीच्या वादातून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. हा वाद विकोपाला जाऊन थेट अधिकाऱ्यांसमोरच हातघाईवर आला. यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली, तर बघ्यांची मोठी गर्दीही उसळली.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित भावाबहीण आपल्या कौटुंबिक मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. मात्र, दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला हा वाद केवळ तोंडी भांडणापुरताच मर्यादित होता, पण काही क्षणांतच तो वाढत गेला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना त्यांनी परस्परांना मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाचे कर्मचारी तरटे मेजर आणि भापकर दादा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करून दोघांना वेगळे केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा कार्यालयात मोठा गोंधळ उडाला असता.

या घटनेनंतर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासन काही कठोर निर्णय घेणार का.? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Advertise..

Leave a Reply