दिनांक ५ मार्च २०२५,श्रीगोंदा:
संत शेख महंमद बाबा यात्रा उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. मात्र, या उत्सवात काही दलाल आणि संधीसाधू व्यावसायिक अवैध आणि असुरक्षित पद्धतीने पाळणे उभारून भाविकांची आर्थिक तसेच सुरक्षेच्या दृष्टीने फसवणूक करत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. यासंदर्भात प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा ७ मार्च २०२५ रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

प्रत्येक वर्षी यात्रेच्या निमित्ताने विविध प्रकारचे पाळणे आणि खेळण्यांचे स्टॉल उभारले जातात. मात्र, या पाळण्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक असते. तसेच, काही पाळणाचालकांकडून भोंगळ कारभार केला जात असून, त्यासाठी ठरावीक दर किंवा नियमावली नसल्यामुळे भाविकांची आर्थिक लूट होत आहे.

यासंदर्भात प्रशासनाने पुढील उपाययोजना तातडीने लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे:
- पाळण्यांचे दर निश्चित करावेत, जेणेकरून भाविकांची आर्थिक फसवणूक होणार नाही.
- प्रत्येक पाळणाचालकाचे वैद्यकीय व फिटनेस प्रमाणपत्र तपासावे, जेणेकरून व्यसनाधीन किंवा अयोग्य व्यक्ती पाळणे चालवू शकणार नाहीत.
- पाळण्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य करावे आणि त्यांचे फिटनेस व दुर्घटनेबाबत हमीपत्र घेण्यात यावे.
- दोन पाळण्यांमधील अंतर वाढवावे, जेणेकरून गर्दी नियंत्रणात राहील आणि दुर्घटना टाळता येतील.
- प्रत्येक पाळणाजवळ आगप्रतिबंधक उपाययोजना आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध असाव्यात.
यात्रेदरम्यान काही पाळणाचालकांच्या आडून जुगार (लाल-काळा सोरट) आणि अवैध व्यवसाय (वेश्याव्यवसाय) चालवले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर, स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने सतर्क राहून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. संभाव्य दुर्घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने पुढील उपाययोजना कराव्यात:
- प्रत्येक पाळणाचालकाने स्वतंत्र ॲम्बुलन्स आणि फायर ब्रिगेडची सोय करावी किंवा प्रशासनाने ही जबाबदारी स्वीकारावी.
- कोणत्याही दुर्घटनेसाठी संबंधित पाळणाचालक जबाबदार राहतील, याची लेखी हमी घेण्यात यावी.
- रात्री ११:०० वाजल्यानंतर पाळणे बंद करण्याचे आदेश लागू करावेत.

७ मार्चला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा
वरील मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा ७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी नितिन जावळे, ऑल इंडिया पँथर सेनेचे अमर घोडके, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान शिंदे, रमण सोनवणे आणि भीमराव घोडके, अंबादास घोडके यांनी दिला आहे.
स्रोत:(आंदोलनाचे निवेदन)

Advertise…
