दिनांक ३ जून,श्रीगोंदा:
कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन दि. ६ जून पासून सोडण्याचा निर्णय दिनांक २९ मे रोजी जलसंपदा मंत्री ना. जयंतरावजी पाटील यांनी जाहीर केला असताना, आ. बबनराव पाचपुते यांनी दिनांक १ जून रोजी उपोषण केले. त्यांचे हे आंदोलन केवळ श्रेयासाठी केलेली नौटंकी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. घनःशाम शेलार यांनी केली आहे.
कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तनाची गरज लक्षात घेऊन, आपण लवकरात लवकर पाणी सुटावे म्हणून जलसंपदा मंत्री ना. पाटील यांचेकडे पाठपुरावा करत होतो. त्या कामी कर्जत – जामखेडचे आ. रोहितदादा पवार यांचीही मदत घेत होतो. दिनांक २९ मे रोजी आपण आ.रोहितदादा पवार व माजी आ. राहुलदादा जगताप यांचेसह (जलसंपदा मंत्री) ना. जयंतरावजी पाटील यांची सिंचन भवन,पुणे येथे भेट घेऊन कुकडीचे पाणी त्वरित सोडण्याचा त्यांचे कडे आग्रह धरला व त्याच भेटीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला.
आम्ही सर्वजण ना. पाटील यांची भेट घेण्यासाठी गेल्याचा सुगावा लागताच, आजच पाण्याचा निर्णय होणार याचे श्रेय स्वतःला मिळावे. म्हणून, आ.पाचपुते यांनी उपोषणाची घोषणा करून श्रेय मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.ही त्यांची कायमचीच सवय आहे. जनतेला हे काही नवीन नाही.आ.पाचपुते यांना पाणी प्रश्नी खरोखर तळमळ असती. तर, त्यांनी दिनांक २९ एप्रिलच्या कालवा सल्लागार समिती बैठकीत निर्णय झाला नाही. त्याच वेळी आंदोलनाची भुमिका घेतली असती. मात्र, तसे न करता आवर्तनाचा निर्णय होताच श्रेयासाठी मात्र पाचपुते सरसावले. कुकडी कालव्याच्या पाण्याबाबत श्रीगोंदा तालुक्यावर सर्वाधिक अन्याय पाचपुते सत्तेत असताना झाला व त्याच काळात सर्वाधिक आंदोलनेही झाली. त्यावेळी आंदोलनाने पाणी येत नसतं अस सांगणारे आ. पाचपुते आत्ता आंदोलनाची नौटंकी का करतात? असा सवाल करून शेलार यांनी २००९ साली आपण पिंपळगांव जोगे धरणातून डेड स्टोअरेज मधून (मृतसाठ्यातून) पाणी काढून शेतक-यांची उभी पिके व फळबागा वाचविण्यासाठी चार दिवस उपोषण केले होते. त्यावेळी पाचपुते मंत्री होते. डेड स्टोअरेजचे पाणी काढूच शकत नाही. असे सांगून मला उपोषण सोडण्यासाठी दबाव आणत होते. याचीही आठवण तालुक्यातील जनतेला आहे. तेच आजची आज पाणी सोडा सांगत उपोषणाला बसले आणि पुढं काय झालं ? त्यांनाच माहित..
मागील पाच वर्षे राहुलदादा जगताप आमदार असताना,त्यांनी आंदोलनाची भुमिका घेतली. की, तुम्ही त्यांची चेष्टा करत होता ? पाणी सोडण्याचा निर्णय झाला की श्रेय तुम्ही घ्यायचे आणि अडचण झाली की दोष आमदारांना द्यायचा. मग आत्ताच श्रेयासाठी जशी धडपड करता तशी अपयश आल तर त्याची जबाबदारी घेण्याचीही दानत ठेवा. असे म्हणत सत्तेत असताना एक भुमिका व विरोधात असले की, वेगळी भुमिका ही बनवा बनवी लोकांना पुरती ठाऊक झाली आहे. असा टोलाही श्री. शेलार यांनी शेवटी लगावला
दोन दिवसांच्या पावसाने शेतक-यांना चांगला दिलासा मिळाला आहे. आता येणारे पाणी शेतक-यांनी व्यवस्थित वापरावे.असे आवाहन शेलार यांनी केले आहे.
