काही अधिकारी व माफियांनी बेकायदेशीर कामे करत, शासनाची फसवणूक केल्याने कारवाईची मागणी..

दिनांक २० मे (पिसोरेखांड,श्रीगोंदा):

श्रीगोंदयातील डोंगर भागात गौण खनिज उत्खनन करीत अनधिकृत माती वाहतूक करून विकली असल्याची तक्रार बहुजन समाज पार्टी चे जिल्हा पदाधिकारी सुनिल ओहोळ व योगेश खेंडके यांनी श्रीगोंदा वनपरिक्षेत्र अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देत केली आहे. सदरील निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी अहमदनगर यांना सादर करण्यात आली आहे.

सविस्तर निवेदनात उल्लेख केल्या प्रमाणे, मौजे पिसोरे खांडच्या पूर्वकडे मोठा डोंगर आहे. या डोगरावरती मोठे मैदानी पठारं आहेत. पठारा वरती पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जात होती. परंतु १० ते १२ वर्षापूर्वी या पठारावरील जमीन एका कंपनीने पवनचक्की साठी खरेदी केली. त्यामुळे ही सर्व जमीन पडीक आहे. हे ठिकाण माळढोक अभयारण्य राखीव क्षेत्रात येत असल्यामुळे किंवा अन्य काही कारणांनी येथे पवनचक्की उभी राहू शकली नाही. त्यामुळे पठारावरील सर्व जमीन पडीक आहे. अशा परिस्थिती मध्ये काही माती माफियांनी गेले दोन महिने या ठिकाणावरून माती उत्खनन करुन वेगवेगळ्या गावामध्ये विकली असल्याचे निदर्शनास आले आहे.

लाखो ब्रास माती उचलण्यात आली असून, तहसिल कार्यालय श्रीगोंदा येथे चौकशी केली असता, ही माती उचलण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे, महसूल, गौणखनिज विभागाचे सतीश घोडेकर यांनी सांगितले आहे. तहसिलदार महेंद्र माळी यांना सांगितले असता त्यांनी कुठलीही कारवाई न करता. आम्हाला कामगार तलाठी यांना फोन करण्यास सांगितले. मागील दोन महिन्यां पासून या ठिकाणावरून लाखो ब्रास माती उचलली जात असताना, या गोष्टी कामगार तलाठी, मंडळाधिकारी, तहसिलदार यांना माहित नसावी, असे होणार नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. किंबहुना हा प्रकार त्यांच्याच आशिर्वादाने चालू असल्याचे खाजगीत लोकांचे म्हणणे आहे. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही सुनिल ओहोळ यांचे म्हणणे आहे.

ही माती पठारावरून खाली आणण्यासाठी डोंगर उतारावरून वनविभागातील झाडे तोडून डोंगर फोडून मोठा रस्ता बनवण्यात आलेला आहे. पूर्वी असा रस्ता नव्हता व शेतकरी बांधव डोक्यावरती माल वाहून आणत होते. आत्ता मात्र ट्रक, हैवा, डंपर सहज ये जा करत आहेत. पोकलैंड मोठे मशिनच्या सहाय्याने हा रस्ता बनविण्यात आला आहे.

दिनांक १८ मे २०२० रोजी सुनिल ओहोळ त्यांच्या कार्यकर्त्यांसह पठारावरती गेले असता, त्या ठिकाणी सहा पोकलैंड मशीन माती भरत होते व अनेक हैवा व इंम्फर गाड्यांनी माती वाहिली जात होती. झाडे तोडून रस्ता बनवल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी दिघे मॅडम यांना सांगितले असता, त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. डोंगर पायथ्यापासून केवळ एक ते दोन किमी अंतरावर  एका वनकर्मचाऱ्याचा बंगला आहे. त्यांना या गोष्टीची माहिती नाही.

तरी निसर्गाचा -हास, झाडे तोडून रस्ता बनवणे, बेकायदेशीर माती उत्खनन करणे, करोडो रुपयांचा महसूल बुडवणे आणि जबाबदार स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, या गोष्टी लॉकडाऊनमध्ये गरीब उपाशी, अर्धापोटी जीवन जगत असतांना,काही अधिकारी व ठेकेदार यांनी या लॉकडाऊनच्या फायदा उठवत बेकायदेशीरपणे कामे करत, शासनाची फसवणूक केली असून, या सर्व बाबींची तात्काळ चौकशी करावी. तसेच, सदर जागेचे पंचनामे करून जबाबदार असणारे सर्वांवरती योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी सुनिल ओहोळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याविषयी ची माहित त्यांनी माध्यमानां प्रसिद्धीस दिली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading