दिनांक १५ जून,श्रीगोंदा:
पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ख्याती असणाऱ्या महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांवर जातीय तिरस्कारातून होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.ते थांबविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीसाठी आज श्रीगोंदा येथे तहसिलदार महेंद्र माळी व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी (मानवाधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष) प्रमोद काळे, (संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हासचिव) राजेंद्र राऊत,(सामाजिक कार्यकर्त्या) मीराताई शिंदे, प्रेरणा धेंडे यांच्यासह (वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष) सुरेश चव्हाण, दिगांबर काळे, रुपेश काळेवाघ, विजय शेलार,(मानवी हक्क अभियानचे शहर जिल्हाध्यक्ष) निलेश गायकवाड, राम घोडके, आशुतोष चव्हाण,(लोकाधिकार आंदोलनचे) संतोष भोसले हे मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यामध्ये अलीकडील काळातच पिंपळे सौदागर पुणे येथील विराज जगताप या तरुणाचा प्रेमसंबंधातून केली गेलेली क्रूर हत्या, मांग वडगाव तालुका केज जिल्हा बीड येथील आदिवासी पारधी समाजातील एकाच कुटुंबातील चार लोकांची क्रूर हत्या,भानगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील दोन वर्षीय बालकाची निर्घुण हत्या तसेच कुटुंबास जीवे मारण्याच्या प्रयत्न, थंडीपवनी ता. जि. नागपूर येथील अरविंद बनसोड नावाच्या उच्चशिक्षित युवकाची गॅस एजन्सीच्या फलकाचा फोटो काढल्याच्या कारणावरून झालेला वाद, लाखखंडाळा ता. वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथील दलित तरूण अमोल गायकवाड याचा झालेला निर्घुण खून, किशोर रणखांबे याच्या वर १५/१६ जणांनी केलेला प्राणघातक हल्ला.अशा मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना घडलेल्या आहेत.
या घटनांना कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी शासनाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. जातीय अत्याचाराच्या गंभीर घटनांचा तपास सरसकट राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावा. जातीय अत्याचाराच्या घटनांचे खटले हे जलदगती न्यायालयात चालवून त्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी. जातीय अत्याचाराच्या घटनांमध्ये दुसऱ्यांदा गुन्हा दाखल होणाऱ्या व्यक्तींवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात यावी. पिंपळे सौदागर येथील विराज जगताप याच्या प्रेमप्रकरणातून झालेल्या दुर्दैवी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटक महिलांची सोशल मिडीयावर बदनामी करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
वरील मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास, अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभरातील सामाजिक संघटनाच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.अशी प्रतिक्रिया मानवाधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष प्रमोद काळे यांनी दिली.
