दिनांक ३ एप्रिल,श्रीगोंदा :
देशात सध्या कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने दररोजचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
दैनंदीन व्यवहार ठप्प झाले असून, सर्व व्यापरी व कामगार वर्गाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मात्र,ज्यांच्याकडे उपजीविकेचे कोणतेही शास्वत साधन नसणाऱ्या समुहांवर आज उपासमारीची वेळ आली आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील विविध सामाजीक सेवाभावी संस्थांच्या माध्यमांतून जीवनावश्यक वस्तू व किराणा पोहोच केला जात असतानाच,आदिवासी परधी समाजातील वंचित कुटुंबांनाही मदत पोहोचावी या सामाजिक जाणीवेतून लोकशिक्षण प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने आज किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी लोकशिक्षणचे अध्यक्ष प्रमोद काळे म्हणाले की, सध्या लॉकडाऊन असल्याने उत्पन्नाचे कोणतेही शास्वत साधन नसणाऱ्या आणि सतत भटकंती करुन आपले जीवन जगणाऱ्या भटके विमुक्त समुहातील लोकांसह आदिवासी पारधी समाजावर आज उपासमारीची वेळ आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही लोकशिक्षण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोशल मीडीयावर मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत प्रा. सुरेश चव्हाण, आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र नागवडे, पुण्यातील इंजि. सागर झनकर, पत्रकार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या आर्थिक मदतीतुन घायपतवाडी, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी येथील काही आदिवासी कुटूंबांना किराणा व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे. मात्र,गरजु लोकांची संख्या मोठी असल्याने येणाऱ्या काळात विविध सेवाभावी संस्था व दानशूर देणगीदारांच्या माध्यमांतून उर्वरित वंचित कुटुंबांना जगण्याचा आधार मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे संचालक राजेंद्र राऊत, दिगंबर काळे हे उपस्थित होते.
