‘घनश्याम दरवडे यांचा मृत्यू झाला’ असा खोटा व्हिडीओ व्हायरल; “छोटा पुढारी” यांची सोशल मीडियावरील बदनामी विरोधात श्रीगोंदा पोलिसांकडे तक्रार, आत्मदहनाचा इशारा.!

दिनांक २६ जुन २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि कार्यक्रम सादरकर्ते म्हणून परिचित असलेल्या घनश्याम दरवडे उर्फ “छोटा पुढारी” यांनी सोशल मीडियावरून त्यांची होत असलेली जाणीवपूर्वक बदनामी थांबवावी, तसेच जबाबदार युट्युब चॅनेल्स आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

२६ जून २०२५ रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या अर्जात दरवडे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, “Sagali Gaani Vajnar” (चॅनेल मालक – ओंकार बल्लाळ सांगली) आणि “RJ Soham” या युट्युब चॅनेलवरून त्यांच्याविषयी बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. या व्हिडिओमुळे त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला असून, त्यांच्या सर्व कार्यक्रमांचे बुकिंग रद्द करण्यात आले असल्याने त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

दरवडे यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित चॅनेलचालकांनी समाजात उभ्या असलेल्या त्यांच्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न केला असून, यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक तणाव व मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यांनी या प्रकरणात संबंधित व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करावी, संबंधित युट्युब चॅनेल्स बंद करण्यात यावेत आणि १० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

याशिवाय, दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘घनश्याम दरवडे यांचा मृत्यू झाला’ असा खोटा आणि दिशाभूल करणारा व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी अशा प्रकारच्या पोस्टमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक धक्क्याबद्दल चिंता व्यक्त केली असून, सदर इन्स्टाग्राम आयडीची माहिती लवकरच संबंधित पोलिसांना पुरवली जाईल असेही त्यांनी नमूद केले आहे.

या सर्व प्रकारामुळे खचलेल्या दरवडे यांनी आपल्या अर्जाच्या शेवटी स्पष्टपणे इशारा दिला आहे की, “जर चार दिवसांत कारवाई न झाल्यास व संबंधित चॅनेल्स व अकाउंट्स बंद न करण्यात आल्यास, हे माझे शेवटचे निवेदन समजावे आणि मी पोलिस स्टेशनबाहेर आत्मदहन करणार आहे.” असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.

स्रोत:(श्रीगोंदा पोलिसांत दिलेली तक्रार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading