जुगार कारवाईने श्रीगोंदा पोलीस आणि पो.नि. शिंदे यांचे अपयश चव्हाट्यावर..? पोलिसांना मदत महागात पडली; गुप्त माहिती देणाऱ्याला जुगाऱ्यांकडून मारहाण..!

श्रीगोंदा, दि. २५ जून २०२५:

श्रीगोंदा शहरानजीकच्या पेडगाव रोडवर सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर काल जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३८ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला. २४ पेक्षा अधिक जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेवर, पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या विशेष पथकाद्वारे पार पडली.

या कारवाईनंतर श्रीगोंदा शहरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक पोलीस प्रशासन व विशेषतः श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर जनतेने संशय व्यक्त केला आहे. अनेक महिन्यांपासून हा जुगार अड्डा सुरु असूनही स्थानिक पोलिसांकडून कुठलीही ठोस कारवाई झाली नव्हती. जिल्हा पथकाने हद्दीत येऊन कारवाई केली.? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.

कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून नेहमीच माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्याचा दावा केला जातो. मात्र, यावेळी उलट झाले. कारवाईची माहिती पोलिसांना देणाऱ्या इसमालाच काल रात्री मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांच्या पथकाने कारवाई करून परतल्यानंतर काही तासांतच ही मारहाण झाली. जुगाऱ्यांनी त्यांच्या गुंड पंटरमार्फतच ही मारहाण केल्याचे बोलले जात आहे.

या प्रकारामुळे एक गंभीर प्रश्न समोर आला आहे – माहिती देणाऱ्याचे नाव आरोपींपर्यंत पोहोचलेच कसे.? पोलिसांमध्येच कुणीतरी माहिती फोडत असल्याचा संशय उपस्थित होत आहे. ही बाब अत्यंत चिंतेची असून, भविष्यात कोण धाडसाने अवैध धंद्यांची माहिती देणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

या घटनेनंतर श्रीगोंद्यातील अवैध व्यवसायांच्या वाढत्या प्रमाणावरही चर्चा सुरू झाली आहे. पेडगाव रोडवरील हा अड्डा, शहरातील अन्य अवैध धंदे – दारू अड्डे, सट्टा आणि मटका यांना स्थानिक पोलीस कितपत आंधळं असूनही मूक संमती देत आहेत का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत.

शहरातील जनतेत नाराजीचं वातावरण आहे. कारवाईनंतरही गुन्हेगार उन्मत्त आणि माहिती देणाऱ्यांवर हल्ले होत असतील, तर कायद्याचा धाक शिल्लक राहिला आहे का? या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading