दिनांक २३ जानेवारी,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात सिद्धार्थनगर येथील रहिवासी भागचंद गंगाराम घोडके (माजी नगराध्यक्ष, श्रीगोंदा नगरपालिका) यांचे राहते घर व जागा अनाधिकारशाहीने बळकावत नमूद मागासवर्गीय कुटुंबाला त्यांच्या राहत्या घर व जागेपासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने, नंदकुमार बोरुडे (हेही माजी नगराध्यक्ष, श्रीगोंदा नगरपालिका) व त्याचा मुलगा गणेश बोरुडे सह अज्ञात ४ ते ५ इसमांनी जेसीबी मशिनच्या साह्याने घर पाडण्याची व जीव मारण्याची धमकी देत, जातीवाचक शिवीगाळ करून जमीन हडपण्याचा गैरप्रकारे प्रयत्न केला आहे. याबाबत भागचंद घोडके यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नंदकुमार उर्फ लक्ष्मण सहादु बोरुडे व मुलगा गणेश लक्ष्मण बोरुडे सह इतर चार – पाच लोकांविरोधात अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक ११ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, नंदकुमार उर्फ लक्ष्मण बोरुडे याने त्याचा मुलगा गणेश बोरुडे व इतर अज्ञात व्यक्तींच्या मदतीने जेसीबी मशीन घेऊन, सिद्धार्थनगर येथील भागचंद गंगाराम घोडके यांच्या राहत्या घरी दांडेलशाहीने घराच्या शेजारील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. झाडेझुडपे, कचरा, मातीचे ढिगारे जेसीबीने लोटुन घोडकेंच्या घराला जेसीबी लावत, उभे घर पाडण्याची धमकी दिली. घोडके यांनी बोरुडेला सदरील जागेचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित असून, निकाल लागल्यानंतर याबाबत निर्णय घ्या. अशी विनंती केली. मात्र, बोरुडे पिता पुत्रांनी त्यांचे काही ऐकून न घेता, घोडकेंना जातीवाचक शिवीगाळ करीत, जीवे मारण्याची धमकी दिली. आरडा ओरडा करत असणाऱ्या गणेश बोरुडेचा आवाज ऐकून घरातील महिला व लहान मुले भिऊन बाहेर आली. त्यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत जेसीबी खाली चिरडून जीव मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी काल दिनांक २२ जानेवारी रोजी रात्री १० वाजता श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नंदकुमार बोरुडे त्याचा मुलगा गणेश बोरुडे सह अज्ञात ४ – ५ इसमां विरोधात भादंवि कलम १४३, १४७, ५०४, ५०६ तसेच अ.जा.ज.का.क. ३(१)(r), ३(१)(s), ३(१)(g), ३(१)(z), ३(२)(va) या ॲट्रॉसिटीच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव हे करीत आहेत.
स्त्रोत:(श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल तक्रार)
