बनगरवाडी..
कामात तिरकसतुंबा हायेच तुमचा. चांगली पंतसरकारनं साळा दिली, मास्तर दिला तर शिकाय का जातंय रं तुमचं?” मग मात्र सर्वांनीच सूर बदलला. पोरे कुणाकुणाला पाठवता येतील त्याची चर्चा झाली. आमचा सदा येईल, आमचा महादा येईल, तुमचा तुका येईल, ह्यांचा सखा येईल – असे करताकरता दहाबारा मुले जमली. कारभारी म्हणाला, ” झालं का मास्तर तुज्या मनासारकं ? लाग उद्यापासनं उद्योगाला !” चर्चेचा शेवट असा झाला. दरम्यान कुणी घरी जाऊन आले होते. मंडळी आता जातील, मग जातील, म्हणून मी बसलो होतो. पण इकडच्या तिकडच्या कथा निघाल्या. पाऊसपाणी, कुरण, मेंढरे – माझे कसे, तुझे कसे हे सुरू झाले.

मी हलकेच कारभाऱ्याला म्हणालो, ” बराय, मग मी पडू का? “”हां हां, पड. पोरं येत्याल सकाळी. काळजी नगं.” आत जाऊन चादर अंथरली आणि धोतर पांघरून पडलो. चिमणीला निरोप दिला. बाहेर बोलणी चाललीच होती. माझा डोळा लागला. मध्ये जागा झालो तेव्हा बाहेर चांद उगवला होता, आणि मंडळीपैकी कुणी चावडीत, तर कुणी त्या पटांगणात बसल्या जागीच घोंगडे खाली – वर घेऊन मुरगाळली होती. आकाश निरभ्र होते. आणि सुरेख चांदणे पडले होते. बाहेर मी बराच वेळ उभा राहिलो. समोर, गावाच्या कडेला दोन बुटकी छपरे होती. त्यांच्या सावल्या पडल्या होत्या. मधल्या बोळातून पलिकडच्या दगडांचा खिळगा दिसत होता. आणि त्यापलीकडे मोकळे रान होते. लांबचलांब पसरलेले रान. दूर फिक्कट दिसणारी झुडपे. आणि जिथे मी उन्हाचा येऊन बसलो ते लिंबाचे झाड शांत उभे होते. त्याच्या वरच्या टोकाला चार पांढरेशुभ्र बगळे स्तब्ध बसले होते.”
मला येऊन आठपंधरा दिवस झाले होते आणि अद्यापही शाळेत मुले येत नव्हती. शाळा भरत नव्हती. कधी एखादे दिवशी दोनतीन मुले येत, तास – अर्धा तास झाला की कंटाळत. लघवीचे निमित्त करून बाहेर जात आणि पुन्हा परत येतच नसत. त्यातून एखादे नियमित येऊ लागले तर कधी बाप तर कधी आई येऊन भाकरी खाण्याच्या निमित्ताने बोलावून नेई, आणि त्याला शेरडांमागे रानात धाडून देई. टंगळमंगळ केल्याबद्दल क्वचित मुलाला दटावले तर तो रडू लागे आणि घरी असलेली त्याची आई धावून येई. “ बाबा, तुला लेकरंबाळं नाहीत का ? मातीत बसली ती साळा ! पोरा, तू चल आपला घरी- ‘ ‘ असे म्हणून चक्क मुलाला हाताला धरून निघून जाई. अशी शाळा चालली होती. रोज मंडळी चावडीपुढल्या पटांगणात जमत. त्यांच्यापुढे ही गोष्ट काढली की म्हणत, “अजून पोरांस्नी सवय न्हाई. महिना – पंधरा दिवस जाऊ द्या. ‘ते जाऊ देण्यावाचून मी तरी काय करू शकत होतो? दरम्यान कारभाऱ्याने एक लहानसे घर मला दिले होते. त्यात मी माझे बिहाड केले. म्हणजे दगड मांडून चूल केली. रविवारी गावी जाऊन दोन भांडीकुंडी आणली आणि हाताने करून खाऊ लागलो. एके दिवशी रात्री भाला घेऊन दादू आला.
चिमणीच्या उजेडात वळकटीला टेकून मी उगाच बसलो होतो. तो आला आणि सतरंजीवर ऐसपैस बसला. हातातला भाला भितीच्या कोपऱ्यात ठेवून म्हणाला, ” हीच जागा आली म्हण की तुझ्या वाट्याला! ‘आतापर्यंत या लोकांच्या निबर बोलण्याची सवय मला झाली होती. आदरार्थी बहुवचन हा प्रकारच त्यांना ठाऊक नव्हता. बरे, ते प्रेमाने, विशेष ओळखीने असले, तर कानांना वाईट लागत नाही; पण कुणीही अनोळखी धनगराने “का गा मास्तरा!” म्हटले की मला कसेसे वाटे. त्यात दादूने तसे म्हणताच ते मला फार लागले. खिशातून चिलीम काढून त्याने तमाखूने भरली. सांडू नये म्हणून पायाचा अंगठा आणि त्या शेजारचे बोट या दोन्हीच्या पकडीत ती उभी धरून ठेवली आणि मोकळ्या हातांनी चकमक मारून गूल पेटवला. पेटता गूल चिलमीवर ठेऊन फक्फक लहान झुरके मारले आणि मग धुराचा लोट सोडला. पोटात गेलेल्या कडक धुराने त्याचे डोळे ओले झाले. पहिल्या भेटीपासून या माणसाविषयी माझ्या मनात अढी निर्माण झाली होती. त्यात चौकशी करता मला कळले की, केवळ टिवल्याबावल्या करून हा माणूस जगत होता. गावावर त्याचे वजन होते. तालुक्याच्या अधिकाऱ्यांशी बसऊठ होती. थोडेफार लिहावाचायला येत असल्यामुळे पुष्कळ वेळा त्याला गावकरी सल्ला विचारत. नाकातोंडातून धूर सोडून त्याने चिलीम विझवली आणि पुन्हा खोलीत नजर फिरवून म्हटले, ” तुज्या अगुदरचा मास्तर ह्याच खोलीत हात व्हता! “
त्या मास्तराने गावात काही खवडव केली म्हणून त्याला मार बसला, गावातल्या लोकांनी त्याला बेदम मारले, असे मी उडत उडत ऐकले होते. त्याची आठवण होऊन पोटातून भीतीची कळ उठली. तरीही तोंडावर काही न दाखवता मी म्हणालो, “असं का? “पण माझा आवाज घाबरलेल्या मेंढरासारखा आला होता. “नीट नोकरी करायची सोडून गावात दादागिरी करायला लागला. पार चुलीपर्यंत पोचला आमच्या. मी ताकीद दिली दोनचार येळा. म्हनलं, आमच्या बायांकडं, पोरीबाळींकडं डोळा उचलून बगू नकंस, गोष्ट बरी होनार न्हाई. पण ऐकलं न्हाई त्येनं. त्येला वाटलं, मी सरकारी नोकर हाय. ही येडी धनगरं माझं काय करनार? ह्या मरनानंच मेलं फुकाट. ‘ एवढे बोलून त्याने आपला निबरट चेहरा खुषीने उजळला आणि आपले तांबडे डोळे माझ्यावर फिरवले. मी दबकून गेलो. सावरून बसलो. कोपऱ्यातला भाला घेऊन त्याने जवळ ठेवला आणि पुन्हा म्हटले, “असाच बसला हुता. हीच येळ, मी आलो आन् एक न्हाई, दोन न्हाई, सरळ हा भाला उलटा घिऊन ठोकला पडंस्तोवर ! धोतर वलं झालं त्येचं. माझं पाय धरायला लागला. रडायला लागला. पण मी रागाला गेलोलो. दहापाच टोले हानून त्यो जवा जमिनीवर निपचित पडला, तवा म्हनालो, मुकाट पोरं शिकव गावात! टगेपना करायला लागलास तर भोकसून मारीन जिवं! ‘चिमणीचा तांबडा उजेड बालट्याच्या हाडक्या तोंडावर पडला होता.
मिशा पिंजारल्या होत्या आणि विडीने काळा पडलेला ओठ त्याने फारोळ्या दातांखाली दाबला होता. मला काय बोलावे हे सुचेना. अभावितपणे “हॅ – हँ– ‘करून मी हसलो, आणि दरवाजाकडे पाहिले. या वेळी कुणीतरी यावे असे मला वाटले, पण बाहेर दाट काळोख होता. मिशा साफ करून दादू म्हणाला, ‘हसू नकंस मास्तरा! ही हसण्यासारकी गोष्ट न्हाई. तू नवा आला हायेस. नीट आपलं काम कर. गावात चबाढब करू नकंस. पोरं साळंत आली तर त्येस्नी शिकव. गावाला शिकवायच्या भानगडीत पडू नकंस! “
क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)
