बनगरवाडी-व्यंकटेश माडगूळकर (भाग ३).

बनगरवाडी..

नसलेल्या, उन्हाने तळणाऱ्या गावाने – त्या रिकाम्या शाळेने- मी जास्तच एकाकी झालो. चिमण्या ओरडत होत्या. एखादी चिमणी चिवचिवली म्हणजे ऐकायला बरे वाटते. पण दहापाच चिमण्या सारख्या ओरडू लागल्या, फडफडू लागल्या, तर नको नको होते. पण त्याच्यावर उपाय नव्हता. दार बंद केले तरी भितीवरून आत वाट होती. डोळे मिटून मी पडलो. चालण्याचे श्रम, जेवण, सावली – यामुळे गुडूप झोपून गेलो. त्या गडद झोपेतून जागा झालो. पडल्यापडल्याच उघड्या दारातून मी समोर बघितले, तेंव्हा दिवस पार मावळून गेला होता. आणि रानातून परत येणाऱ्या मेंढरांचा गलका ऐकू येत होता. मी फार वेळ झोपलो होतो आणि अद्यापही उठावे असे वाटत नव्हते. कारण माझे पाय विलक्षण दुखत होते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

दोन्ही हात डोक्याखाली घेऊन तुळयांकडे बघत काही वेळ मी पडून राहिलो. बाहेर मेंढरांचा गलगा सारखा वाढत होता. मेंढक्यांनी घातलेल्या उंच आरोळ्या लांबून जवळून ऐकू येत होत्या. धनगरी कुत्री भुंकत होती, कोंबडे आरवत होते, माणसे बोलत होती. आणि चिमण्या – कावळे गोंधळ करीत होते. मघा, दुपारी निर्जीव वाटणारे गाव एकदम जिवंत झाले होते, विलक्षण जोमाने हलू लागले होते. मी बाहेर आलो. पटांगणात येऊन उभा राहिलो. ज्या वाटेने मी आलो, तो भालाईत आला, आणि तो म्हातारा आला, त्या सर्व वाटा येणाऱ्या मेंढरांनी भरून गेल्या होत्या. खाली माना घालून ती जनावरे भराभर चालत होती. त्याच्या पायांचा दबका आवाज येत होता. धूळ उडत होती. धुळीवर शेकडो खूर उठत होते. आणि धोतर खोचलेले, काळेभोर धनगर खांद्यावर आडवी काठी टाकून तोंडाने चमत्कारिक आवाज करीत त्यांच्यामागून येत होते. त्यामेंढरांच्या लोंढ्यांतून शेरडे होती. केसाळ कुत्री होती.

पश्चिमेकडे तांबडेभडक झाले होते. पूर्वेकडे वारा वाहत होता. पांढऱ्या ढगांचे लहानलहान पुंजके तांबड्या पश्चिमेकडून निळ्याकाळ्या पूर्वेकडे पसरले होते. जमिनीप्रमाणे आभाळातही पांढरी मेंढरे वाडग्याकडे चालली होती! लेकुरवाळ्या मेंढ्या धावत धावत आल्या. आठदहा दिवसांची त्यांची पोरे घरी राहिली होती, ती ढांगुळ्या पायांवर शरीरे तोलीत चालू लागली. पातळ गुलाबी जिभा बाहेर काढून कातर आवाजात ओरडू लागली. मेंढरांचा घोळका आल्याबरोबर कासेत शिरून ढुशा देऊ लागली. घरोघरी रानातून परत आलेल्या धनगरणींनी चुली पेटवल्या. काडाच्या छपरातून त्यांचा धूर आभाळात चढू लागला. मेंढके मेंढरे कोंडण्याच्या खटपटीस लागले. बघता बघता गर्द काळोख झाला. मेंढरांचा गलगा, कावळे – चिमण्यांची गजबज, माणसांच्या हाळ्या – सारे विरून गेले. शाळेबाहेरच्या जोत्यावर, पाय खाली सोडून मी बसून राहिलो. वर चांदण्या चमकत होत्या. खाली दिवे लुकलुकत होते. वाऱ्याच्या थंड झुळका येत होत्या. कुणीतरी अंधारातून आले आणि समोर एका बाजूला असलेल्या मारुतीच्या लहान देवळात दिवा लावून गेले. त्या उजेडात जाऊन भाकरी खावी आणि पोरीने दिलेल्या पाण्यातले उरलेले पाणी प्यावे, असा विचार मनात आला; पण शरीराने अमलात आणला नाही. खांबाच्या तळखड्याला टेकून मी त्या अंधाराकडे बघत बसूनच राहिलो. आता इथून पुढे तीन वर्षे माझे गाव हेच होते. इथेच मला राहायचे होते. या मंडळीत मिसळायचे होते. त्यांचा विश्वास, प्रेम मिळवायचे होते . प्रतिष्ठा मिळवायची होती. आणि हे सारे करता करता, उखणून उकिरडा झालेली, चिमण्यांच्या विष्ठेने आणि चिलटांच्या वासाने भरलेली ती शाळा नावारूपाला आणायची होती.

पोरे जमवायची, त्यांना शाळेची गोडी लावायची, आपण गावात राहायचे आणि प्रतिष्ठा मिळवायची, या सर्वाला मोठी आडकाठी म्हणजे माझे पोरसवदा वय आणि किरकोळ अंगकाठी. आणि हे असे आडमुठे गाव. जिथे आजपर्यंत दहापाच मुले कधी नियमित शाळेत आली नाहीत ते गाव. हे कसे जमणार ? कसे निभणार ? समोर पाय वाजले. मारुतीच्या देवळातल्या दिव्याचा मंद पिवळा – तांबडा उजेड बाहेर आला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर कुणी काळी आकृती दिसली. मला अंधारात काहीही दिसत नव्हते. केवळ कुणी तरी जवळ आले एवढेच दिसले.

मी थोडा ठसकलो. ” कोन, मास्तर बसलाय काय ? ” मी म्हातारबाबाचा आवाज ओळखला. “होय, या.”भाकरी खाल्लीस का ? ” ‘ नाही. खाईन आता. ” हे दूध आनलंय बग शेरडाचं. ” जोत्यावर भांडे ठेवल्याचा आवाज मी ऐकला. त्या दिशेने पुढे हात केला तेव्हा हाताला भांडे लागले. दरम्यान आणखी कोणी अंधारातून आले आणि खाकरूनखोकरून पायरीवर बसले. म्हाताऱ्याने विचारले, ” कोन हाय ? ” मी हो कारभारी- ” आनंदा ? ” ” हां. ‘आ लेका, मास्तर अंधारात बसलाय. घराकडे जाऊन चिमनी तरी आन जा. ‘कोन मास्तर? “म्हाताऱ्याला सुरवातीपासून सगळे सांगावे लागले. कोण मास्तर, कशासाठी आला आहे, केव्हा आला आहे, कुठला, कुणाचा ? या सर्वांची उत्तरे कारभाऱ्यांनी दिली. आनंदाने ऐकून घेतली , आणि मग तो चिमणी आणण्यासाठी निघून गेला. तांब्याभांडे, दिवा, अंथरूण या वस्तू अतिशय आवश्यक होत्या . त्या मी येतानाच आणायला पाहिजे होत्या. पण ध्यानी आले नाही. आनंदा रामोशी चिमणी आणण्यासाठी निघून गेला. तो माघारा येईपर्यंत आणखी दहाबारा माणसे आली आणि घोंगडी टाकून खाली धुळीतच बसून राहिली. एकमेकांच्या बोलण्यावरूनच त्यांना ओळखी पटल्या. कुणाचे तरी मेंढरू लांडग्याने मारले होते.

त्याविषयीचे तपशील पुरवले गेले. ती लांडग्याची मादी कुठल्याशा तालीत व्याली आहे, तिची छावणी तिथे आहे, रात्री जाऊन मारली तर कहार चुकेल… असे बोलले गेले. कुणीतरी त्याची चेष्टा केली. जनावर असे सापडणे शक्य नाही, ते नेहमी फिरते असते, असे त्याचे मत पडले. आणि हे सर्व झाल्यावर कुणा माणसाने बातमी आणली की ते मेंढरू लांडग्याने नाही, कुत्र्यानेच मारले, ते कुत्रे अमक्यातमक्याचे आहे, आणि ही घटना अमक्यातमक्याने बघितली. फेट्याचा शेव आडवा धरून आनंदा रामोशी चिमणी घेऊन आला. त्या उजेडात बारापेक्षाही अधिक माणसे धुळीत बसल्याचे माझ्या ध्यानी आले. बहुतेक सर्वांच्या अंगात अंगरखे नव्हते. बहुतेक सर्वापाशी जाड घोंगड्या होत्या. कुणी त्या बोळा करून खाली टेकायला घेतल्या होत्या, तर कुणी अंगावर टाकल्या होत्या. क्वचित एखादादुसरा खोळ घेऊन बसला होता.

शाळेत जाऊन आनंदाने आणलेल्या चिमणीच्या उजेडात मी खाऊन घेतले आणि बाहेर आलो. कारभाऱ्यांनी विचारले, ” खाल्ली भाकरी ? “मी म्हणालो, “हां.” खाकऱ्याखोकऱ्यावरून अद्यापही सभा बसून होती हे कळले. एकवार आतील चिमणी बाहेर आणावी असे वाटले. पण ती वाऱ्याने राहिली नसती आणि माझ्याशिवाय कुणालाही त्याची जरुरीही वाटत नव्हती. माझ्या शेजारी बसलेला आणि’ बाळा ‘म्हणून माझ्याशी बोलणारा हा पिकला म्हातारा गावचा कारभारी आहे, हे मला ह्या वेळपर्यंत जाणवले होते. लोक त्याचा उल्लेख कारभारी म्हणून करीत होते. काही वेळाने न दिसणाऱ्या सभेला उद्देशून कारभारी म्हातारा म्हणाला, ‘ अरं, मास्तर आलाय. पोरांस्नी धाडा उद्यापास्नं साळंत. ‘ कुणीतरी खाकरून धुंकले.

हलक्या आवाजात शेजाऱ्यांशी बोलल्यासारखे कुणी बोलले, ‘कुठं हायेत गावाला पोरं ?’ म्हातारा आवाज चढवून म्हणाला, ” मग काय वांझोटाच हाय का रं गाव ? ” ” तसं नाही. पर साळंत याला मोकळं असं पोर हाय कुठं ? ” “ एक सुदीक न्हाई ? सगळी कामातच हायेत म्हण की ! ‘ ” न्हाई, पर मेंढरांमागं, शेरडांमागं जात्यात हो. रिकामं कोन हाय ? ” क्षणभर उलटसुलट प्रश्नांचा नि उत्तरांचा गलगा वाढला. मग मी म्हणालो, “ सहा वर्षांपुढची मुलं शेरडांमागं जातात, ती एकटी जातात का ? “”कुठली जात्यात ? रानमाळात हिंडत्यात थोरल्या भावामागं. लहानगी असली की दोघंतिघं मिळून शेरडांमागं जात्यात. ‘मग अशी मुलं असतील ती पाठवा. त्यांना लिहावाचायला आलं तर काही तोटा होणार नाही. झाला तर फायदाच होईल ! ‘लांबून तमाखूने कमावलेला आवाज आला, ‘आन् त्याला पोटाला गा? ” मला क्षणभर उत्तर सुचले नाही. मुले शाळेत आली तर त्यांना पोटाला कुणी घालावे, कसे, हा प्रश्न मला कधी जाणवला नव्हता. लहान मुलांना आईबाप मिळवून खाऊ घालतात, अशी माझी समजूत होती . पण म्हाताऱ्याने परस्पर उत्तर दिले. तो म्हणाला, ” पोटानं मरू लागली तर माझ्या घरी ये. जोंधळे घालीन तुला पायलीभर. बायली, ज्या त्या “

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading