अहिल्यानगर, दि.२२ एप्रिल :-
जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये लिंग गुणोत्तर कमी आहे अशा प्रत्येक तालुक्यातील १५ गावांची निवड करून त्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये १५ दिवसांपेक्षा अधिक काळ गैरहजर असणाऱ्या मुलींची माहिती नियमितपणे सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.
महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम, परिविक्षा अधिकारी योगिराज जाधव व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ.आशिया म्हणाले, गत तीन महिन्यांत विभागाने ४८ बालविवाह रोखण्यात मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. यापुढेही या कामात अधिक दक्षता घ्यावी. बालविवाह प्रतिबंधासाठी प्रभावी समन्वय व सातत्यपूर्ण पाठपुरावा आवश्यक आहे.
मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत तालुकास्तरावर नियमित बैठका आयोजित करण्याबाबत दक्षता घ्यावी, योजनेची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
महिला हेल्पलाईन क्रमांक १८१ व बालकांसाठी १०९८ या टोलमुक्त क्रमांकाची व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध व निवारण कायद्यांतर्गत सर्व कार्यालयांमध्ये अंतर्गत समित्या स्थापन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
“बेटी बचाओ बेटी पढ़ाओ” योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून मुलींचे शिक्षण व सक्षमीकरण यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले. बैठकीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी विभागाच्या कामकाजाचा आढावा सादरीकरणाद्वारे मांडला.














Leave a Reply