दिनांक २ ऑगस्ट २०२६, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात गुटखा आणि पान मसाला विक्रीवर बंदी असूनही, जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कारवाईनंतरही या व्यवसायावर आळा बसताना दिसत नाही. दिवसेंदिवस गुटख्याची विक्री वाढत असून, यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात स्थानिक पोलीस आणि जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
तालुक्यात गुटखा विक्रीमध्ये जे लोक माहीर आणि शातीर समजले जातात, त्यांनाच हाताशी धरून जर एलसीबी (LCB) कारवाई करत असेल, तर त्या कारवाईच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. नुकत्याच झालेल्या एका कारवाईत, जो व्यक्ती गुटखा विक्रीतील सर्वात मोठा संशयित म्हणून चर्चेत आहे, त्याच व्यक्तीला ‘पंच’ म्हणून ठेवल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे एलसीबी आणि गुटखा विक्रेते यांच्यात एक अनाकलनीय समन्वय असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील जनता भोळी-भाबडी असली, तरी त्यांना परिसरातील गुन्हेगारीचा आणि गुन्हेगारांचा इतिहास चांगलाच माहित आहे. स्थानिक पोलीस प्रशासन असो, जिल्हा प्रशासन असो किंवा कारवाई करणारे अधिकारी, सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडताना भान राखण्याची गरज आहे. कारवाईच्या नावाखाली होणारी ‘जादू’ जनतेला मान्य नाही, असा सज्जड दमही नागरिकांनी दिला आहे.
ज्या संशयितावर गुटखा विक्रीचे गंभीर आरोप आहेत, त्यालाच कारवाईत पंच म्हणून घेतल्याने एलसीबीच्या कार्यपद्धतीवर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. अशा प्रकारच्या संशयास्पद कारवाईमुळे प्रशासनाच्या प्रतिमेला गालबोट लागत असून, खरा गुटखा माफिया मोकाट आणि कारवाई केवळ कागदावर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणाची दखल घेऊन अशा संशयास्पद कार्यपद्धतीवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणाची दखल घेऊन अशा संशयास्पद कार्यपद्धतीवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
