भीषण घटना.. “पत्नीसोबत वाद: चार मुलांना विहिरीत ढकलून श्रीगोंद्यातील इसमाची आत्महत्या”..!

दिनांक १६ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा/राहता अहिल्यानगर:

राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात शनिवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. माहेरी गेलेल्या पत्नीने सासरी परतण्यास नकार दिल्याने आणि मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून पतीने चार लहान मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली (ता. श्रीगोंदा) येथील अरुण सुनील काळे (वय ३०) याची पत्नी शिल्पा यांच्यात वाद झाल्याने ती माहेरी, येवला तालुक्यात राहात होती. ती परत येत नव्हती. त्यामुळे अरुण काळे आपल्या चार मुलांना घेऊन तिला आणण्यासाठी दुचाकीवर निघाला.

कोऱ्हाळे येथे आल्यानंतर त्याने पत्नीशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने संपर्क तुटला. याचा राग आणि दारूच्या नशेत असताना अरुण काळे याने आपल्या चार मुलांना — शिवानी (८), प्रेम (७), वीर (६) व कबीर (५) — विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर स्वतःही उडी घेत आत्महत्या केली.

शनिवारी दुपारी विहिरीत दोन मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती केलवडचे पोलीस पाटील सुरेश गमे पाटील यांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. शिर्डी व राहाता नगरपरिषदेचे आपत्ती निवारण पथक तातडीने पाचारण करण्यात आले.

विहिरीत ३० ते ३५ फूट पाणी असल्याने सुरुवातीला मदतकार्य अशक्य ठरत होते. अखेर गळ सोडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आणि पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

मृत अरुण काळे याने आधी पत्नीशी बोलताना आत्महत्येची धमकी दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसत असले तरी, सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू असल्याचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी सांगितले.

या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चार निरागसांचे प्राण वाया गेल्याबद्दल सर्वत्र दु:ख व्यक्त केले जात आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Check out this shop on Meesho – https://www.meesho.com/ENGELA?_ms=3.0.3

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading