दिनांक : १६ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा:
“श्रीगोंदा शहराची दुरवस्था; नगरपालिका कार्यरत आहे की ठप्प..? नागरिकांमध्ये तीव्र नाराजी”
श्रीगोंदा शहरातील रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य अशा मूलभूत सुविधांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था श्रीगोंदा नगरपालिका खरोखर कार्यरत आहे की नाही..? असा गंभीर प्रश्न आता शहरातील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

शहराच्या विकासासाठी असलेले कामकाज संथ गतीने सुरू असून अनेक योजना केवळ कागदावरच असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. यामुळे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत हा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- रस्त्यांची दुर्दशा: शहरातील मुख्य आणि आंतरिक रस्ते खड्डेमय झाले असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
- फूटपाथ आणि डिव्हायडर गायब: बसवलेले पेविंग ब्लॉक चोरीला गेले आहेत. पावसामुळे डिव्हायडर वितळल्यासारखे झाले आहेत.
- पाणीपुरवठा ठप्प: वाड्या–वस्त्यांवरील पाण्याची व्यवस्था बंद पडलेल्या ट्रॅक्टरमुळे विस्कळीत झाली आहे.
- वीज व पथदिवे निष्क्रिय: शहरातील अर्ध्याहून अधिक पथदिवे बंद पडले आहेत. सौरदिव्यांची स्थितीही गंभीर असून अंधारामुळे नागरिकांना धोका वाढला आहे.
- आरोग्य विभाग निष्क्रिय: जंतुनाशक फवारणी किंवा फॉगिंग कधीच होत नाही. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.
- कचरा व्यवस्थापन निकृष्ट: घंटागाड्या वेळेवर न धुतल्याने त्यातूनच शहरभर दुर्गंधी आणि व्हायरस पसरण्याची शक्यता वाढली आहे.

“पालिका प्रशासन अस्तित्वात आहे की नाही..? असा प्रश्न पडावा अशी अवस्था झाली आहे. प्रशासक सीओ भगत मॅडम यांच्या कारभारावर कुठलेच नियंत्रण दिसत नाही. शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढत असून कुणीही लक्ष देत नाही.” – नागरिक

नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. मात्र सध्या प्रशासक असल्यामुळे सर्व कामकाज संथ गतीने सुरू आहे. नागरिकांची नाराजी दिवसेंदिवस वाढत असल्याने आगामी निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे.

श्रीगोंदा शहरातील नागरी सुविधा कोलमडलेल्या अवस्थेत असून नागरिक प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. योग्य वेळी उपाययोजना न झाल्यास ही समस्या मोठे आंदोलनाचे स्वरूप घेऊ शकते.

शहरातील नागरी सुविधा कोलमडलेल्या अवस्थेत असून नागरिक प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. योग्य वेळी उपाययोजना न झाल्यास ही समस्या मोठे आंदोलनाचे स्वरूप घेऊ शकते.
स्रोत:(अधिकृत माहिती)





