दिनांक १७ ऑगस्ट २०२५,अहिल्यानगर –
सह्याद्री मल्टिसिटी निधी लिमिटेड या संस्थेतील फसवणुकी प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरात (वय३५, रा. सावेडी, अहिल्यानगर) व दरेवाडी शाखेचा मॅनेजर दिलीप तात्याभाऊ कोरडे (वय ३५, रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना दि. १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी प्रमोद राजेंद्र साठे (रा. नारायणडोह, ता. अहिल्यानगर) यांनी ९ जून रोजी दिलेल्या तक्रारीनुसार सुरुवातीला १८ जणांची ६६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा उल्लेख होता.

हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर पोलिसांनी तपास अधिक गतीमान केला. उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख तपास करत आहेत.

या तपासादरम्यान पोलिसांनी आतापर्यंत १६० गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविले असून, फसवणुकीचा आकडा तब्बल ३ कोटी ८३ लाख ५५ हजार ४९६ रुपयांवर पोहोचला आहे.

थोरात व कोरडे यांना यापूर्वी शेवगाव पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. ते न्यायालयीन कोठडीत असतानाच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना पुन्हा ताब्यात घेतले.

स्रोत:(ऑनलाइन वृत्त)

Advertise..



