दिनांक १८ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा:
सुरोडी गावच्या विद्यमान सरपंच मीनाक्षी सकट यांच्यावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १७ ऑगस्ट २०२५) घडली. हल्ल्यात त्यांच्या मोटारसायकलला पेट्रोल शिंपडून जाळण्यात आले. यात मीनाक्षी सकट यांच्या साडीला आग लागून पाय भाजले, तर त्यांचा मुलगा सार्थक याने पळ काढल्याने जीव वाचला; मात्र त्यालाही मुका मार लागला.

या प्रकरणी शरद लाटे व एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीस तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.

मीनाक्षी सकट या मातंग समाजातील असून, ग्रामसभेत जातीवरून अपमानित करणे, त्यांच्या वडिलोपार्जित जागेत बेकायदेशीर अतिक्रमण करणे, तसेच पोकलेन लावून वाढदिवस साजरा करणे या कारणांवरून यापूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संदीप वागस्कर, विलास वागस्कर व शरद लाटे यांच्यावर ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा राग मनात धरूनच हा पेट्रोल हल्ला झाल्याचा आरोप आहे.

स्वातंत्र्य दिनानंतर अवघ्या दोन दिवसांतच दलित समाजातील महिला सरपंचवर हल्ला झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

याबाबत बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी इशारा दिला आहे की, “आरोपींना अटक झाली नाही तर (दि. १८ ऑगस्ट २०२५) पासून पोलीस स्टेशनसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल,” तसेच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Advertise..


