मी मुलीकडे नांदायला जाईल..! पण, मला लग्नासाठी स्थळ सुचवा.. दौंड मेळाव्यात एका तरुणाची अशीही मागणी.. दौंड मध्ये पार पडला पहिला वधुवर मेळावा.. मराठा सोयरिक संस्थेचा ८२ वा मोफत मेळावा संपन्न.

दिनांक १९ जानेवारी २०२४, श्रीगोंदा/दौंड:

सर काही करा.. पण, मला लग्नासाठी स्थळ सुचवा.. मी त्या मुलीच्या घरी नांदायला जायला तयार आहे.. म्हणून, आपण मला लग्नासाठी स्थळ सुचवावे.. अशी कळकळीची विनंती एका तरुणाने दौंड मधील वधू वर मेळाव्यामध्ये आयोजकांकडे केली. नुकताच रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी दौंड मध्ये पहिलाच मोफत मराठा वधू वर परिचय मेळावा प्रचंड गर्दीमध्ये पार पडला..

Advertisement

सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहरामध्ये योगराज पॅलेस या ठिकाणी रविवारी दुपारी १२:०० ते ४:०० या वेळेमध्ये सामाजीक कार्यकर्ते व मराठा सोयरिक संस्थेचे संस्थापक श्री अशोक कुटे व योगराज पॅलेसचे संचालक श्री जितेंद्र अशोक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला.

या मेळाव्यामध्ये सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, प्रसिद्ध शिवव्याख्याते राहुल शिंदे, दौंड तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन शरद नातू, कृषी सहाय्यक अंगद शिंदे, मराठा उद्योजक लांबीचे नगर जिल्हा संघटक सागर मोरे, सेवानिवृत्त वन अधिकारी प्रभाकर कड, जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हा सचिव सुषमा जाधव, भाऊसाहेब वाघ, अमोल गांगर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मेळाव्यास १००० पेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित होते. एकूण २२४ नाव नोंदणी झाली. २२४ पैकी मुलींची संख्या अत्यल्प म्हणजे फक्त १९ मुलींची नाव नोंदणी झाली. तर २०५ मुलांची नाव नोंदणी झाली. यामध्ये कमी शिक्षण म्हणजे बीए च्या आतील शिक्षण असलेल्या मुलांची संख्या फार आहे. परंतु, बीए च्या आत शिक्षण असलेली एकही मुलगी मेळाव्यात नसल्यामुळे कमी शिकलेल्या मुलांना व शेतकरी मुलांना मुली अजिबात मिळणार नाही. त्यामुळे बऱ्याच मुलांची नाराजी आली. लग्नासाठी मुली मिळत नाही. अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावामध्ये व प्रत्येक समाजामध्ये आहे.

Advertisement

संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, आम्ही आत्तापर्यंत ८१ वधू वर मेळावे घेतलेले आहे. प्रत्येक मेळाव्यामध्ये अशी परिस्थिती असते. साधारणपणे एकास सहा, एकास सात असे मुला मुलींचे प्रमाण असते. पण दौंडच्या मेळाव्यात मात्र एकास दहा असे प्रमाण आहे. ज्या मुलांचे शिक्षण बीए पेक्षा कमी आहे. शेती करतात आणि ज्यांचे वय ३० पेक्षा जास्त झालेल आहे. अशा मुलांनी लग्नासाठी विधवा व घटस्फोटीत महिलांचा स्वीकार करावा. अन्यथा त्यांचे लग्न होऊच शकत नाही. अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध शिवव्याख्याते राहुल शिंदे सर यांनी केले. नाव नोंदणी साठी कृषी सहाय्यक अंगद शिंदे, सोनाली वाघ व सहकाऱ्यांनी कामकाज पाहिले.

“दौंड तालुक्यामध्ये हा पहिलाच मराठा मोफत वधु वर मेळावा असल्यामुळे अनेकांना याची उत्सुकता लागली होती. सकाळी ११:०० वाजल्यापासूनच अनेक लग्नाळू मुले मोठ्या आशेने या ठिकाणी मेळाव्याला येऊन बसले होते.”

अशोक कुटे

भविष्यामध्ये असा मेळावा पुन्हा घेण्याची अनेकांनी मागणी या ठिकाणी केली. तसेच संक्रात सणामुळे बऱ्याच जणांना मेळाव्याला येता आले नाही. पुढील मेळावा हा बारामती, इंदापूर या भागात घेतला जाईल, असे रामभाऊ घाडगे यांनी सांगितले. तसेच ज्यांना मेळाव्यात येता आले नाही. त्यांनी स्थळांसाठी ७४४७७८५९१० या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

स्त्रोत:(अशोक पांडुरंग कुटे,अध्यक्ष मराठा सोयरीक संस्था..९८५०२०३९१४.. जितेंद्र मगर, संचालक योगराज पॅलेस दौंड..)

दौंड येथील वधु वर मेळाव्यात प्रतिमा पूजन करताना मान्यवर..

दौंड येथील वधू-वर मेळाव्यात जमलेली प्रचंड गर्दी..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading