पेडगाव ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय: शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी..

दिनांक १० फेब्रुवारी २०२५,पेडगाव, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीने लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला आहे. या निर्णयाचे गावकऱ्यांसह व्यावसायिकांनीही स्वागत केले आहे.

गावातील आरोग्याबाबत चिंता व्यक्त करणारा एक दुर्दैवी प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. एनर्जी ड्रिंकच्या अति सेवनामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली. त्यानंतर ग्रामपंचायतीने या विषयावर गांभीर्याने विचार करून तातडीने शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदीचा ठराव संमत केला.

तज्ज्ञांच्या मते, कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंकचे मुलांच्या आरोग्यावर अनेक घातक परिणाम होतात:

  • लठ्ठपणाचा धोका वाढतो
  • अतिसाखरेमुळे दातांचे नुकसान होते
  • पचनासंबंधी समस्या निर्माण होतात
  • हाडे कमकुवत होतात
  • पाण्याची कमतरता जाणवते
  • स्मरणशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता वाढते

पेडगावमध्ये सुमारे ८ हजार लोकसंख्या असून तीन शाळांमध्ये जवळपास एक हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. पालक आणि व्यावसायिकांनी ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमधून शीतपेयांची विक्री थांबवली असून पालकांनीही मुलांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूकता दाखवली आहे.

पेडगाव ग्रामपंचायतीचा हा निर्णय इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. आरोग्यासाठी घेतलेला हा ठराव कौतुकास्पद असून राज्यातील इतर ग्रामपंचायतींनीही अशा प्रकारचा ठराव मंजूर करून मुलांच्या आरोग्याचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading