तहसीलदार आणि तहसील कार्यालयाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आक्रमक आंदोलन; ॲड.बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली जनतेचा एल्गार.. सोलापूरकराच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध..!

दिनांक १० फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

तहसीलदार आणि कार्यालयातील भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी अॅड. संभाजीराव बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली आज श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने नागरिकांनी आक्रमक आंदोलन केले. तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय समस्यांवर रोखठोक भूमिका मांडत तहसीलदारांच्या गैरव्यवहारांबाबत जनतेने संताप व्यक्त केला.

यावेळी राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध करण्यात आला. तहसील कार्यालयातील भ्रष्ट कारभार आणि विविध प्रकरणांचा तपशील देत नायब तहसीलदार जाधव यांना निवेदन सादर करण्यात आले.

गट क्रमांक १७४९ मधील १० हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या जमिनीच्या हस्तांतरण प्रकरणात तहसीलदारांनी कायद्याची पायमल्ली केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. १९१२ साली चिमाजी कोथिंबीर यांनी खरेदी केलेल्या या जमिनीवर संस्थेने आरोग्यसेवा, विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह आणि समाजहित उपक्रम राबवले होते. १९७३ साली संस्थेची अधिकृत नोंदणी झाली. मात्र तहसीलदारांनी अनधिकृतपणे सातबारा नोंदीत फेरफार करत दीपक नामदेव गायकवाड यांच्या नावावर मालकीची नोंद केली असल्याचे समोर आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर संशय:
दीपक गायकवाड, वैभव पारखे, संदिपान तुपारे आणि सतीश भालेराव यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळवल्यामुळे याबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अॅड. बोरुडे यांनी तहसीलदार व दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करण्याची आणि त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर आज तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच आणि बोरुडे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जनतेच्या हक्कांसाठी आणि अन्यायाविरोधात सुरू केलेल्या या आंदोलनाला तालुक्यातून मोठा पाठिंबा मिळाला.

स्रोत:(आंदोलन)

यावेळी उपस्थित जनसमुदाय..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading