रायगडावर कडाडला जिवा महाला… शिवभक्त रोमांचित!

दिनांक १० फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

टाकळी कडेवळीत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळूंजवस्तीच्या चौथी इयत्तेत शिकणाऱ्या अर्णव दत्तात्रय वाळूंज याने रायगडावर शिवशंभू प्रेमींच्या मनावर राज्य केले आहे. शिवजयंतीपूर्व कार्यक्रमात किल्ले रायगडावर त्याने सादर केलेल्या “मी जिवा महाला बोलतोय” या एकपात्री अभिनयाने उपस्थितांना थक्क केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ‘अफजलखान वध’ प्रसंगावर आधारित या नाट्यमय सादरीकरणाने उपस्थितांमध्ये राष्ट्राभिमान जागवला. अर्णवच्या प्रभावी शब्दफेकीने, दमदार अभिनयाने आणि अफलातून संवादांनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. काहींनी आनंदाश्रू ढाळले तर काहींनी त्याला खांद्यावर घेऊन सन्मानित केले.

“मी जिवा महाला बोलतोय… इतिहास फक्त वाचून चालत नाही, तो घडवायलाही शिका. आजचे युग तलवारीचे नाही, पण पुस्तक आपली ढाल आणि पेन आपली तलवार आहे!”
अशा ठसक्याच्या संवादांनी अर्णवने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या अफलातून अभिनयासाठी त्याला हजारों रुपयांची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या वतीने आयोजित किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड पालखी सोहळ्यात अर्णवने आपल्या पालकांसोबत सहभाग घेतला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात रायगडावर त्याने आपली कला सादर केली.

  • “होरपळलेला इतिहास जिवंत झाला,” असे काहींनी सांगितले.
  • “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” हा संवाद ऐकून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.

या अभिनयासाठी अर्णवला त्याचे वर्गशिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक विजय गायकवाड आणि राजेश इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय वाळुंज, उपाध्यक्ष राजेश आजबे, नारायण वाळुंज, नितिन वाळुंज, फक्कड वाळुंज, रावसाहेब वाळुंज, ॲड. अशोक वाळुंज, महेंद्र वाळुंज, अनिरुद्ध वाळुंज, राहुल वाळुंज, शिवहारी वाळुंज यांनी अर्णवच्या कलेचे मनःपूर्वक कौतुक केले.
शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी अर्णवच्या यशाचा आनंद उत्साहात साजरा केला.

अर्णव वाळूंजच्या या अभिनयाची सध्या महाराष्ट्रभरातून प्रशंसा होत असून त्याचे कार्य भविष्यातही प्रेरणा देणारे ठरेल, याची खात्री आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading