दिनांक ९ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या वतीने किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड पालखी सोहळा उत्साहात मार्गस्थ झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या रथयात्रेचे हे दुसरे वर्ष आहे. तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी शुभेच्छा देत या ऐतिहासिक रथयात्रेचे स्वागत केले.

पालखी सोहळ्याला बाळासाहेब नाहटा, एम. डी. शिंदे, अरविंद कापसे, रमेश शिंदे, राजुदादा गोरे, सुनिल वाळके यांसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांच्या काळापासून श्रीगोंदे तालुक्याचा रायगडाशी ऐतिहासिक ऋणानुबंध आहे. धर्मवीरगड हा श्रीगोंदा तालुक्यातील एकमेव किल्ला असून, पांडे पेडगावचा प्रसिद्ध बहादूरगडही इतिहासाचा साक्षीदार आहे. छत्रपती संभाजी महाराजांना १ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर येथे पकडून या किल्ल्यावर आणण्यात आले होते. रायगडाची भेट त्यानंतर अधुरीच राहिली. या इतिहासाच्या स्मरणार्थ शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने या रथयात्रेचे आयोजन केले आहे.

८ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांची पालखी धर्मवीरगडावरून निघाली असून, २५० किलोमीटरचा प्रवास करून ९ फेब्रुवारी रोजी रायगडावर पोहोचणार आहे. या रथयात्रेत अनेक महिला, पुरुष, बाल मावळे आणि नागरिक सहभागी झाले आहेत. गावोगावी नागरिकांकडून या रथयात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.

रथयात्रेच्या मार्गावर संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर कोळगाव, नागेश्वर मंदिर घारगाव, श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज, पेडगाव येथील शौर्य स्थळाला अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर काष्टी, दौंड, पुणे मार्गे पाचाडला पोहोचून रायगडावर ही यात्रा समाप्त होईल.
श्रीगोंदे तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र चरणांचा इतिहास जपणे श्रीगोंदेकरांचे कर्तव्य असल्याचे या रथयात्रेच्या आयोजकांनी सांगितले. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कळमकर आणि त्यांच्या ४१ जणांच्या शिलेदार टीमने या ऐतिहासिक उपक्रमाचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे.

या रथ यात्रेत शिव प्रेमींमध्ये जोश आणि उत्साह दिसून येत आहे. इतिहास जतन करण्यासाठी अशा उपक्रमांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
