दिनांक ९ फेब्रुवारी २०२५,शिर्डी (ता. राहाता):
येथे गावठी कट्ट्यांचा गैरवापर करून हवेत फायरिंग करून दहशत निर्माण करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत तीन गावठी पिस्टलसह एकूण २,७०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरचे पोनि श्री. दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोठी कारवाई केली.

पोलीस अधीक्षक मा. श्री. राकेश ओला यांनी जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी पोनि दिनेश आहेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गणेश आप्पासाहेब शेजवळ (वय ३४, रा. भिमनगर, शिर्डी) याने गावठी कट्ट्याचा वापर करून दहशत निर्माण केल्याची माहिती समोर आली. त्याने केलेल्या फायरिंगचा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाईसाठी पथक रवाना केले.

गणेश आप्पासाहेब शेजवळ याला आरबीएल चौकाजवळ ताब्यात घेतल्यानंतर त्याने माहिती दिली की त्याचे चुलत भाऊ अजय रत्नाकर शेजवळ (रा. भिमनगर, शिर्डी) याच्याकडे अग्नीशस्त्र आहे. पंचांसमक्ष अजय शेजवळच्या घराची झडती घेतल्यावर १,५०,००० रुपये किमतीचे तीन गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे व तीन रिकाम्या काडतुसे जप्त करण्यात आली.

गणेश व अजय यांच्या ताब्यातून १,२०,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान गणेशने पिस्तूल विक्री करणाऱ्या इसमांची माहिती दिली. यामध्ये भाऊसाहेब साहेबराव जगताप (रा. शिर्डी), राकेश पगारे (पूर्ण पत्ता अज्ञात) आणि रोशन सोमनाथ कोते (रा. शिर्डी) यांची नावे समोर आली. त्यातील रोशन कोते (वय 24) याला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

शिर्डी पोलीस ठाण्यात अन्वये आर्म ऍक्ट कलम ३/२५, ७, २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे.
मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, आणि मा. श्री. शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई केली.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
