शौर्यस्थळी स्वच्छतेचा संकल्प; गडकिल्ले संवर्धनाची उभारली गुढी.. किल्ले धर्मवीरगडवर शिवदुर्गची ७० वी प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम.

दिनांक ३० मार्च २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले धर्मवीरगड येथे शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या वतीने हिंदू नववर्ष, चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) या पवित्र दिवशी ७० वी प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरणपूरक गुढी उभारण्यात आली. गडाच्या शौर्यस्थळी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत नव्या वर्षाच्या सुरुवातीला गडकिल्ले संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.

महाराष्ट्रभर गडकिल्ले संवर्धन व अभ्यासपूर्ण गडभेटींसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने स्थानीय वारसा जतन उपक्रमाला धर्मवीरगडावर प्रारंभ केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावर शौर्यस्थंभास पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना गडाच्या ऐतिहासिक महत्वाची सखोल माहिती देण्यात आली.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी गडावर उपस्थितांना छत्रपती संभाजी महाराज आणि धर्मवीरगड (पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला) यांचा ऐतिहासिक संदर्भ समजावून सांगितला.

छत्रपती संभाजी महाराज दोन वेळा या गडावर आले होते. तसेच श्रीगोंदा, धर्मवीरगड आणि रायगड यांचा ऐतिहासिक संबंधही उपस्थितांना उलगडून दाखवण्यात आला. श्रीगोंदेकरांचे ईमान रायगडच्या मातीशी असल्याची ऐतिहासिक माहिती प्रथमच ऐकायला मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

गेल्या काही काळात धर्मवीरगडावर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रभरातून अनेक शिवप्रेमी आणि पर्यटक गडावर येत आहेत. त्यामुळे गडाच्या शौर्यस्थळी प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर साचला होता. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने हा संपूर्ण प्लॅस्टिक कचरा गोळा करून गड परिसराची स्वच्छता केली आणि योग्य विल्हेवाट लावली.

या मोहिमेत शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीचे उपाध्यक्ष सचिन भोसले, दिगंबर भोसले, अमोल बडे, जालिंदर पाडळे, अक्षय गायकवाड, संगिता इंगळे, सीमा भोसले, अर्चना बडे, नीरज पाडळे, आविष्कार इंगळे, वैभवी भोसले, शौर्य भोसले यांचा विशेष सहभाग होता.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे धर्मवीरगडावर गडकिल्ले संवर्धनाची नवी गुढी उभारली आहे. शिवप्रेमींनी या पवित्र स्थळी कचरा न टाकता स्वच्छता राखण्याचा संकल्प केला आहे. यापुढेही गडसंवर्धन मोहिमा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचा निर्धार शिवदुर्ग परिवाराने व्यक्त केला आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading