चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रा. राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन..

दिनांक ११ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:

चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गुरुवार, दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल प्रा. राम शिंदे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात शेतकरी आणि महिला बचत गटांचा मेळावाही होणार असल्याची माहिती समितीचे संस्थापक व्हॉईस चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी दिली.

या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रा. राम शिंदे यांचा सत्कार होणार आहे. सत्कार समारंभासाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचे १८ वे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर तुळशीदास महाराज नामदास यांच्या हस्ते प्रा. शिंदे यांचा सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील भूषविणार आहेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

विठ्ठलराव वाडगे यांनी सांगितले की, “प्रा. राम शिंदे यांनी मंत्रीपदावर असताना उल्लेखनीय कार्य केले आहे. आता सभापती पदाच्या माध्यमातूनही ते न्याय देण्याची भूमिका बजावतील. त्यांच्या सन्मानासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.”

कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी आणि महिला बचत गटांना शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. या माध्यमातून त्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा उद्देश असल्याचे वाडगे यांनी सांगितले.

नगर-दौंड मार्गावरील पारगाव फाटा येथे चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व शेतकरी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विठ्ठलराव वाडगे यांनी केले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading