दिनांक ११ एप्रिल २०२६,श्रीगोंदा:
काष्टी (ता. श्रीगोंदा) परिसरात तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि घरात शिरून लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. पुणे क्राईम ब्रांचच्या मदतीने ही मोठी कारवाई करण्यात आली असून, वैभव सुभाष चौधरी आणि साई संजय मदने या दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी अनेश सुभाष गोरे (रा. चौधरीमळा, काष्टी) यांच्या घरावर आरोपी सुभाष चौधरी, वैभव चौधरी, साई मदने आणि इतर १०-१५ जणांनी सशस्त्र हल्ला केला होता. यावेळी आरोपींनी तलवारीने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला केला, ज्यात ते थोडक्यात बचावले. इतकेच नव्हे तर, आरोपींनी घरात शिरून महिलांना मारहाण केली आणि सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली होती. जाताना “जिवंत राहायचे असेल तर दरमहा १५,००० रुपये द्यावे लागतील,” अशी धमकी देत खंडणीची मागणीही केली होती.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ३३३, ३०८(३) आणि आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना हे आरोपी पुणे परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली.
त्यांनी तातडीने पुणे क्राईम ब्रांच युनिट-०२ शी संपर्क साधून माहिती दिली. पुणे पोलिसांनी सापळा रचून वैभव चौधरी आणि साई मदने यांना ताब्यात घेतले. त्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर व त्यांच्या पथकाने पुण्यात जाऊन आरोपींना ताब्यात घेतले आणि ८ एप्रिल २०२६ रोजी रीतसर अटक केली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलयुमॅ आणि डीवायएसपी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये श्रीगोंदा पोलीस पो.नि. किरण शिंदे, पीएसआय मनोहर खिळदकर, गहीनीनाथ यादव, संदीप राऊत, महादेव कोहक, अरुण पवार, सचिन वारे, विवेक दळवी, वैजिनाथ कुटे, राहुल गुंडू व नितीन शिंदे तसेच पुणे क्राईम ब्रांच (युनिट-०२) मपोनि अश्विनी जगताप, संजय जाधव, उज्ज्वल मोकाशी, नागनाथ राख, विजयकुमार पवार आणि साधना ताम्हणे यांनी केली आहे..
“सदर आरोपींनी काष्टी किंवा परिसरातील इतर कोणावर अन्याय केला असेल किंवा कोणाकडे खंडणी मागून त्रास दिला असेल, तर त्यांनी न घाबरता श्रीगोंदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी,” असे आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे.
स्रोत:(श्रीगोंदा पोलीस)
